वर्षभरात गरजूंना दोन हजार घरकुले
By admin | Published: May 18, 2015 04:05 AM2015-05-18T04:05:42+5:302015-05-18T04:05:42+5:30
आदिवासी, मागासवर्गीय आणि दारिद्रयरेषेखालील बेघर कुटुंबीयांना इंदिरा आवास योजनेचे घरकुल जातप्रवर्गाच्या प्राधान्यक्रमानुसार दिले
ठाणे : आदिवासी, मागासवर्गीय आणि दारिद्रयरेषेखालील बेघर कुटुंबीयांना इंदिरा आवास योजनेचे घरकुल जातप्रवर्गाच्या प्राधान्यक्रमानुसार दिले जाते. यानुसार वर्षभरात सुमारे दोन हजार घरकुलांचे बांधकाम करून ते संबंधितांना वाटप केले जाणार आहे.
सुमारे एक लाख रुपये खर्चाच्या या घरासाठी शासनाकडून ९५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. लाभार्थ्याला श्रमदानातून पाच हजारांचे योगदान घरकुलासाठी करावे लागणार आहे. मागील वर्षी सुमारे चार हजार ६०० घरकुले मंजुर करण्यात आली. यापैकी तीन हजार ६७ घरांचे काम पूर्ण झाले आहे. एक हजार ६५१ घरांचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. याप्रमाणेच या आर्थिक वर्षात सुमारे दोन हजार घरकुलांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्राप्त झालेल्या जुन्या प्रस्तावांच्या अर्जदारांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. याकरिता गटविकास अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर प्रस्ताव मागण्याचे काम जिल्हा परिषदेकडून केले जात आहे. (प्रतिनिधी)