भगवानगडावर दसरा मेळावा घ्याच!
By admin | Published: October 6, 2016 05:03 AM2016-10-06T05:03:08+5:302016-10-06T05:03:08+5:30
भटक्या विमुक्तांचा दसरा मेळावा भगवानगडावर घेण्यासाठी भटके-विमुक्त हक्क परिषदेने महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांना पाठिंबा दिला आहे
मुंबई : भटक्या विमुक्तांचा दसरा मेळावा भगवानगडावर घेण्यासाठी भटके-विमुक्त हक्क परिषदेने महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांना पाठिंबा दिला आहे. ३० वर्षांपासून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली बहुजन समाजाची चळवळ पंकजा यांनी पुढे नेण्याचे आवाहन परिषदेचे अध्यक्ष धनंजय ओंबासे यांनी केले आहे.
ओंबासे म्हणाले, दसरा मेळावाच्या परंपरेत खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अशा समाजविघातक शक्तींना त्याचे विदारक परिणाम भोगावे लागतील. नाशिक येथील बंजारा समाजाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेसह पाथर्डी आणि कोपर्डी येथील अत्याचारांच्या घटनांचा परिषदेने निषेध व्यक्त केला. शिवाय या सर्व प्रकरणांतील खटले जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली. त्यात दोषी आढळणाऱ्या प्रत्येक आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणीही ओंबासे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कार्याध्यक्ष शंकर माटे म्हणाले की, बहुजन समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे असंतोषाचे वातावरण आहे. परिणामी, इदाते समितीच्या शिफारसी सरकारने तत्काळ लागू करण्याची गरज आहे. भटक्या-विमुक्तांमध्येही एक गट अत्यंत श्रीमंत झाला असून बहुसंख्य समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. त्यामुळे या समाजासाठी सरकारने स्वतंत्र मंत्रालय निर्माण करून अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद करावी, असे आवाहन माटे यांनी केले. (प्रतिनिधी)