कुटुंबाची धुरा वाहताना तिचे सीमेवर कर्तव्य
By Admin | Published: March 8, 2015 01:04 AM2015-03-08T01:04:56+5:302015-03-08T01:04:56+5:30
दुसरीकडे दोन मुलींना संभाळत आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडून उत्कृष्ट कर्तव्यसेवा बजावणारी माझी मुलगी गेली १५ वर्षे सीमा सुरक्षा दलामध्ये काम करीत आहे.
पुंडलिक माने, उषा जाधव
आपल्या नातेवाईक व मूळ गावापासून हजारो मैल दूर पंजाबच्या सीमेजवळ सतत युद्धजन्य परिस्थितीत किंवा अतिरेकी कारवायांच्या छायेखाली वावरणे... आणि दुसरीकडे दोन मुलींना संभाळत आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडून उत्कृष्ट कर्तव्यसेवा बजावणारी माझी मुलगी गेली १५ वर्षे सीमा सुरक्षा दलामध्ये काम करीत आहे. विशेष म्हणजे सुमारे एक हजार जवानांच्या या बटालियनमध्ये ती एकमेव महिला अधिकारी आहे. माझ्या मुलीने माझा देशसेवेचा वारसा पुढे चालवला, याचा मला विशेष अभिमान आहे. तिच्या कर्तृत्वाला एक पिता म्हणून माझा ‘सलाम’ आहे.
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफ या देशातील सर्वात मोठ्या निमलष्करी दलामध्ये ३९ वर्षे सेवा बजावलेले पुंडलिक माने आपल्या मुलीबद्दल भरभरून बोलत होते. उषा लिंगराजन जाधव असे त्यांच्या मुलीचे नाव. पुरुषांच्या बरोबरीनेच लष्करी प्रशिक्षण घेऊन उषा या उपनिरीक्षक म्हणून ‘बीएसएफ’मध्ये ३० जून २००० रोजी भरती झाल्या. ग्वाल्हेर येथील प्रशिक्षण केंद्रात सहा महिने प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राजस्थानमधील बिकानेर व अनूपगढ़, गुजरातमधील गांधीधाम, पश्चिम बंगालमधील रायगंज तसेच इंदूर आदी ठिकाणी काम केले.
त्या सध्या पंजाबमधील १४० बटालियन येथे कार्यरत आहेत. संपूर्ण बटालियनच्या पगारासह त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार उषाच सांभाळतात. आणि आर्थिक व्यवहार सांभाळत असल्या तरी प्रतिकूल परिस्थितीत अन्य बीएसएफ जवानांसह खांद्याला खांदा लावून लढण्याची तयारी त्यांना नेहमीच ठेवावी लागते.
वडिलांची बीएसएफमधली कारकीर्द पाहिल्यामुळे त्यांना लष्करामध्ये जाण्याची इच्छा निर्माण झाली होती. सुदैवाने त्यांचे पती लिंगराजन हेसुद्धा बीएसएफमध्येच तांत्रिक विभागात नोकरीला आहेत. लष्करामध्ये नोकरी करीत देशसेवेचा वसा जोपासणाऱ्या या दाम्पत्याला दोन मुली आहेत. शिवानी आणि गार्गी अशी त्यांची नावे आहेत. त्या जेव्हा नोकरीवर रुजू झाल्या तेव्हा स्त्रियांचे तेथील प्रमाण नगण्य होते.
बीएसएफसारख्या दलामध्ये स्वत:चे करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणारे तरुण खूप आहेत. परंतु मुलींचे प्रमाण मात्र खूपच कमी आहे. माने यांना तशा दोन मुली आणि एक मुलगा. परंतु त्यांची सर्वात मोठी मुलगी असलेल्या उषा यांनी त्यांच्या कुटुंबामधून कोणीतरी लष्करात जावे ही इच्छा पूर्ण केली. त्यांना आपल्या मुलीविषयी मोठा आदर आणि अभिमानही आहे. आपल्या मुलीविषयी ते सर्वांना आवर्जू$न सांगत असतात. एक हजार पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सीमेवर काम करणाऱ्या आपल्या मुलीबाबत मानेंसारख्या कणखर लष्करी अधिकाऱ्याचे मनही हळवे होते.
बीएसएफमध्ये काम करायची संधी मिळणे ही अभिमानाची बाब
४कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळे सहसा मुली या क्षेत्राकडे दुर्लक्ष करतात, मात्र माझे सर्व मुलींना सांगणे आहे, की तसा विचार करू नका. बीएसएफसारखी संस्था आणि त्यात काम करायची संधी मिळणे ही अभिमानाची बाब आहे.
४मी बीएसएफमध्ये आले तेव्हा तर मुलींसाठी हे क्षेत्र नसल्यातच जमा होते. आता काळ बदलला आहे. अगदी सीमेवरही मुलींना पाठवण्याचा निर्णय अधिकारी घेतात.
४महिलांवरचे वाढते अत्याचार बघता सर्व मुलींना लष्करी प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे आणि हे प्रशिक्षण घेऊन आपल्या देशासाठी चांगली सेवा करण्याचे ध्येय पूर्ण होत असेल तर ती संधी प्रत्येक मुलीने स्वीकारली पाहिजे.