संघर्ष पर्वाचा अस्त! मानवलोकचे द्वारकादास लोहिया यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 11:55 PM2018-11-23T23:55:20+5:302018-11-23T23:55:56+5:30

येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालीग्रामजी लोहिया (८१) यांचे शुक्र वारी रात्री १०.४५ वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

Dwarkadas Lohia Passes Away | संघर्ष पर्वाचा अस्त! मानवलोकचे द्वारकादास लोहिया यांचे निधन

संघर्ष पर्वाचा अस्त! मानवलोकचे द्वारकादास लोहिया यांचे निधन

Next

अंबाजोगाई (जि. बीड) : येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालीग्रामजी लोहिया (८१) यांचे शुक्र वारी रात्री १०.४५ वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मागील बारा दिवसांपासुन ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी २ वाजता मानवलोक मुख्य कार्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात प्रा. अभिजीत लोहिया, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, मुलगी प्रा. अरूंधती पाटील, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.
राष्ट्रसेवादल, सानेगुरूजी आरोग्य मंडळ, सोशालिस्ट पार्टी आदी व्यापक संघटनामध्ये स्वत:ला झोकून देत जनसामान्यांच्या दु:खावर फुंकर घालून त्यांचे सत्व जपणारे व संघर्षाची प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची संपुर्ण महाराष्ट्राला ओळख होती. मानवलोकच्या माध्यमातून अंबाजोगाईचे नाव त्यांनी जगाच्या नकाशावर पोहोचविले. सामान्य माणसांचा आधारवड म्हणून त्यांचा सर्वत्र लौकीक होता. मानवलोक या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साडेचार दशके विविध सामाजिक उपक्र म राबविले. मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित व परित्यक्त्या महिलांना आधार दिला. गरिब व निराधारांचाही ते आधार होते.
डॉ. द्वारकादास लोहिया यांचा जन्म ममदापूर पाटोदा या खेड्यातील पारंपारिक राजस्थानी कुटुंबात ७ सप्टेंबर १९३८ मध्ये झाला. त्यांचे वडील बंधू कै. अ‍ॅड. भगवानसा लोहिया हे हैदराबादमध्ये शिक्षण घेत असताना रझाकार विरोधी चळवळीत सहभागी झाले. त्यामुळे डॉ. लोहियांवर लहानपणापासूनच सामाजिक संस्कार झाले. १९६२ च्या दशकात ते धुळे येथील सेवादल सैनिक, अ‍ॅड. शंकरराव व शंकुतला परांजपे यांची मुलगी शैला परांजपे यांच्याशी विवाहबद्ध झाले. १९६० ते १०९६२ या काळात त्यांनी हडपसर येथील महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी रुग्णालयात काम केले. आपला बीड जिल्हा सर्वस्वी मागासलेला आहे. नेहमीच दुष्काळग्रस्त असतो याची जाणीव ठेवून २४ डिसेंबर १९६२ साली त्यांनी अंबाजोगाई येथे दवाखाना सुरू केला ते आणि त्याचा गट विविध प्रश्नांवर चिनी आक्रमण, हिंदू-मुस्लिम दंगे, जातीयता, दलितांना होणारा त्रास या प्रश्नांवर सतत संघर्ष करीत व लोकांचे प्रबोधन करीत सातत्याने काम करण्याच्या व बोलत राहण्याच्या उपक्रमामुळे बाबरी मशीद, मुंबई बॉम्ब स्फोट, मराठवाडा विद्यापिठाचे नामांतरण या संघर्षाच्या काळात अंबाजोगाई परिसर व मानवलोकचे काम ज्या भागात आहे ती खेडी येथे शांतता राहिली. त्यांचा जातीयतेवर कधीच विश्वास नव्हता.
१५ आॅगस्ट १९७४ मध्ये डॉ. लोहियांनी खाजगी दवाखाना बंद केला व महाराष्ट्र आरोग्य मंडळ, हडपसरची शाखा अंबाजोगाई येथे सुरू केली. तेथे डॉक्टर म्हणून डॉ. लोहिया पूर्ण वेळ काम करू लागले. १९७५ च्या जून मध्ये आणिबाणी जाहिर झाली. १९७० ते १९७५ च्या काळात विविध मागण्यांसाठी केलेला संघर्ष, मोर्च यामुळे त्याां पहिल्याच दिवशी अटक झाली. १९ महिने ते नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मिसाबंदी म्हणून होते. १९७७ मध्ये सुटका झाल्यावर त्यांनी भावठाणा येथे ग्रामीण लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कामास सुरुवात केली. पुढील कामासाठी जेथे रस्ते नाहीत, शाळा नाहीत, नाल्यावर पूल नाहीत अशा डोंगर भागात काम करण्याचे ठरविले व त्यासाठी पुढील सर्व आयुष्य देण्याचे ठरविले. शैला लोहिया या १९७० साली स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात अध्यापक म्हणून त्या काम करू लागल्या. मुलांचे शिक्षण व घर खचार्ची जबाबदारी त्यांनी उचलून डॉ. लोहियांना संपूर्ण जीवन सामाजिक कामाला देण्यासाठी प्रेरणा दिली. कला पथकातून साठलेल्या पैशातून घेतलेल्या जागेमध्ये नवी संस्था सुरू करण्याचे ठरविले. १ एप्रिल १९८२ रोजी डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्षे त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सामाजिक गटाने मराठवाडा नवनिर्माण लोकायत (मानवलोक) ही संस्था स्थापन केली. संस्थेची पूर्णवेळ सेवक म्हणून जबाबदारी डॉ. लोहियांनी स्वीकारली. गेल्या २६ वर्षात सुमारे १५० खेडयांमध्ये ही संस्था काम करीत आहे. या डोंगर परिसरात बंजारा, हाटकर, वंजारी, ठाकर असे अनेक जाती जमातींचे गट राहतात. त्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी मानवलोक काम करीत आहे.

Web Title: Dwarkadas Lohia Passes Away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.