बिथरलेल्या बिबट्याचा संशयास्पद मृत्यू
By admin | Published: January 2, 2015 01:19 AM2015-01-02T01:19:05+5:302015-01-02T01:19:05+5:30
बिबट्याला रस्त्यावर फिरताना पाहून! येथील रुईकर कॉलनी, महाडिक माळ परिसरात गुरुवारी सकाळी तब्बल चार तास बिबट्याची भ्रमंती सुरू होती.
कोल्हापुरात भर दुपारी थरार : वनखात्याकडे साधनेच नव्हती, जेरबंद करण्याच्या प्रयत्नात ३ जखमी
कोल्हापूर : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोल्हापूरकरांची भीतीने गाळण उडाली ती, बिबट्याला रस्त्यावर फिरताना पाहून! येथील रुईकर कॉलनी, महाडिक माळ परिसरात गुरुवारी सकाळी तब्बल चार तास बिबट्याची भ्रमंती सुरू होती. सोशल मीडियाद्वारे याची माहिती पसरताच लोकांचे लोंढे या परिसराकडे लागले. त्यामुळे हा बिबट्या जास्तच बिथरला. त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा कामाला लागली. तब्बल चार तासांनी त्याला पकडण्यात यश आले. त्याला वनविभागाच्या गाडीतून चांदोली अभयारण्यात नेले; परंतु तिथेच त्याचा दुपारनंतर मृत्यू झाला. त्याच्या या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
‘उच्चभ्रूंची वसाहत’ अशी ओळख असलेल्या रुईकर कॉलनीला लागून असलेल्या महाडिक वसाहतीमध्ये सकाळी सव्वासहाच्या सुमारास महापालिका आरोग्य केंद्राच्या मोकळ्या मैदानात बांधकाम कामगार मारुती होसमणी यांना बिबट्या दिसला. घाबरलेल्या होसमणी यांनी ओरडून इतरांना सावध केले. त्यातच रुईकर कॉलनीत बिबट्या आल्याची माहिती व्हॉटस् अॅपद्वारे शहरात पसरली. त्यामुळे या परिसरात लोक सहलीला आल्यासारखे सहकुटुंब तिथे आले होते. बिबट्या अंगावर आला तर काय होईल, याची भीती त्यांना नव्हती.
या गर्दीमुळे बिबट्या अधिकच बिथरला आणि त्याने खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. या निवासस्थानासमोरील मोकळ्या जागेत पुन्हा काही तरुणांनी धाडसाने बिबट्याला बांबू, काठ्या, आदींनी मारहाण करीत हुसकावून लावले. त्यामुळे चवताळलेल्या बिबट्याने उद्योजक अरविंद देशपांडे यांच्या ‘गजेंद्र’ बंगल्यातील बागेत आश्रय घेतला. तेथून त्याने थेट बंगल्याच्या गेटशेजारी असणाऱ्या पडक्या स्वच्छतागृहात काहीकाळ तळ ठोकला. त्यानंतर बिबट्याने थेट बंगल्याच्या पुढील पोर्चमध्ये ठिय्या मारला. त्याला पकडण्यासाठी वनखात्याकडे काहीच साधने नव्हती.
च्कुंचीकोरवे समाजाच्या तरुणांनी बिबट्याला पकडण्यासाठी डुकरे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी आणली. ती जाळी टाकून पकडताना त्याने प्रतिहल्ला केला. त्यात दोघे तरुण जखमी झाले. चवताळलेला बिबट्या तेथून सुटला असता तर काहीतरी अघटित घडले असते; म्हणून कुचकोरवी समाजातील वीसहून अधिक धाडसी तरुणांनी जाळीसह बिबट्याच्या अंगावर उड्या घेतल्या व त्याला जेरबंद केले.
देशपांडे यांच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये बिबट्या शांतपणे बसला होता. त्याचवेळी त्याला ट्रॅन्क्युलायझरचे (भुली) इंजेक्शन दिले असते, तर तो शांत झाला असता आणि त्याला पकडण्याचे काम दहा मिनिटांत झाले असते. पण, दुर्दैवाने ते झाले नाही.
- रमण कुलकर्णी, मानद वन्यजीव संरक्षक
मोठ्या प्रमाणातील लोकांची गर्दी पाहून बिबट्याला मानसिक धक्का बसला. त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा.मृत्यूचे खरे कारण त्याचे पोस्टमार्टम केल्यानंतरच स्पष्ट होईल.
- जी. साईप्रकाश, मुख्य वनसंरक्षक
कोल्हापूरातील महाडिक माळ परिसरात गुरुवारी सकाळी बिबट्याची भ्रमंती सुरू होती. गोंगाटाने बिबट्या पिसळला. तब्बल चार तासांनी त्याला पकडण्यात यश आले. त्याला चांदोली अभयारण्यात नेले; परंतु तिथेच त्याचा दुपारनंतर मृत्यू झाला.
बिबट्या हा प्राणी माणसाच्या वस्तीलाच धरून राहतो, असे अलीकडील अभ्यासातून पुढे आले आहे. भटकी कुत्री हे त्याचे सगळ्यांत महत्त्वाचे खाद्य आहे. आता शहरांमध्ये कुत्र्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळेच तो नागरी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. याबद्दल वनविभाग त्याबद्दल फारसा जागरूक नाही. त्यांच्याकडे बिबट्या, गवा विहिरीत पडला अथवा नागरी वस्तीत घुसला तर त्याला कसे पकडायचे याची कोणतीच यंत्रणा व साधनेही नाहीत. अग्निशमन दल जसे सज्ज व प्रशिक्षित असते, तशीच रेस्क्यू टीम वनविभागाकडेही हवी; तरच अशा दुर्घटना टाळता येतील.
- संजय करकरे, सहाय्यक संचालक, व्याघ्र प्रकल्प, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, नागपूर