अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू

By admin | Published: May 9, 2017 02:33 AM2017-05-09T02:33:12+5:302017-05-09T02:33:12+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या मंत्रिमंडळातील काही अकार्यक्षम मंत्र्यांची गच्छंती करून काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे.

Dysfunctional ministers dropped | अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू

अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या मंत्रिमंडळातील काही अकार्यक्षम मंत्र्यांची गच्छंती करून काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. गुणवत्ता आणि कार्यक्षमता या निकषावरच हा फेरबदल असेल.
मुख्यमंत्री फडणवीस हे गतिमान आणि पारदर्शक निर्णयांचा आग्रह धरत आले आहेत. प्रचंड कार्यक्षमतेने झोकून देऊन काम करण्याची त्यांची शैली आहे. आपल्या सहकारी मंत्र्यांनी याच पद्धतीने काम करावे ही त्यांची साहजिकच अपेक्षा आहे. एकटे मुख्यमंत्री अन् बोटावर मोजण्याइतके काही मंत्री वगळले तर अन्य बहुतेक मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड चांगले नाही. या मंत्र्यांच्या सुमार कामगिरीचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवरही झाला आहे. ही प्रतिमा बदलण्यासाठी मंत्र्यांना बदलावे लागेल, अशी चर्चा आहे.
सूत्रांनी सांगितले की, कार्यक्षमतेच्या मुद्द्यावर काहींना वगळून नव्या चेहऱ्यांना मंत्री करण्याच्या मुद्द्यावरच पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना मंत्रिमंडळ फेरबदलाची परवानगी दिली आहे. त्यामुळे जात, प्रादेशिक संतुलन या नेहमीच्या फुटपट्ट्यांपेक्षा कार्यक्षमता, आवाका या निकषांवर नजीकच्या काळात मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतो.
राज्याच्या विविध क्षेत्रांतील विकासाचे आपले व्हिजन सक्षमपणे राबविण्यासाठी तेवढ्याच सक्षम मंत्र्यांचा समावेश असलेल्या ‘टीम देवेंद्र’ची आवश्यकता स्वत: मुख्यमंत्र्यांना भासत आहे. अडीच वर्षांनंतरही सरकारचा म्हणावा तसा प्रभाव पडत नसेल तर काही बदल करणे गरजेचे आहे, या निष्कर्षाप्रत ते आले असल्याचे त्यांच्या निकटस्थांनी सांगितले.
भाजपासोबतच शिवसेनेच्याही काही अकार्यक्षम मंत्र्यांना बदलले जाऊ शकते. पक्षाच्या चार कॅबिनेट मंत्र्यांबाबत शिवसेना आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. ‘मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन’ असे ठाकरे यांनी त्या वेळी सांगून आमदारांना शांत केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्याही काही मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय ठाकरे यांनी लवकरच घेतला तर भाजपासोबतच शिवसेनेच्याही काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविला जाऊ शकतो. त्याबाबतचे सर्वाधिकार हे ठाकरे यांचे असतील.
सरकारची प्रतिमा उंचावण्याचा उद्देश-
हा फेरबदल नक्की कधी होईल, हे सांगता येणार नाही. मात्र, फेरबदल झालाच तर तो मोठा असेल. उर्वरित अडीच वर्षांत सरकारची प्रतिमा उंचावण्याचा उद्देश समोर ठेवूनच हा फेरबदल असेल.
सक्षम मंत्र्यांचा समावेश असलेल्या ‘टीम देवेंद्र’ची आवश्यकता स्वत: मुख्यमंत्र्यांना भासत आहे. अडीच वर्षांनंतरही सरकारचा म्हणावा तसा
प्रभाव पडत नसेल तर काही बदल करणे गरजेचे आहे, या निष्कर्षाप्रत ते आले असल्याचे त्यांच्या निकटस्थांनी सांगितले.

Web Title: Dysfunctional ministers dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.