विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह डीवायएसपी काकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 01:02 AM2018-03-25T01:02:04+5:302018-03-25T01:02:04+5:30
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी पतीसह सासू, नणंद, नंदोई व डीवायएसपी काकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. संदीप विजय जाधव, हिराबाई विजय जाधव, अर्चना महादेव जाधव, महादेव जाधव व चुलतकाका उत्तम जाधव अशी आरोपींची नावे आहेत.
अमरावती : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी पतीसह सासू, नणंद, नंदोई व डीवायएसपी काकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. संदीप विजय जाधव, हिराबाई विजय जाधव, अर्चना महादेव जाधव, महादेव जाधव व चुलतकाका उत्तम जाधव अशी आरोपींची नावे आहेत.
शहरातील एका तरुणीचे १० फेब्रुवारी २०१५ रोजी संदीप जाधव (मूळ खामगाव, रा. पुणे) याच्याशी लग्न झाले. लग्नानंतर संदीपने पत्नीशी वाद घातला. पत्नीच्या बँक खात्यातील पैसे काढण्याचेही प्रकार संदीपने सुरू केले. पुण्यात प्लॉट घेण्यासाठी १५ लाख रुपये माहेरहून आणण्याचा तगादा लावला. विवाहितेने पुण्यातील वाकड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे प्रयत्न केले. मात्र, सासरकडील काही जण पोलीस खात्यात वरिष्ठ पदावर असल्यामुळे तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तिने केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार
पोलीस तक्रार घेत नसल्याने पीडितेने खासगी वकील स्वप्ना जाधव यांची मदत घेतली. जाधव यांनी ही तक्रार ई-मेलद्वारे पंतप्रधान कार्यालय, महिला सरंक्षणमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बुलडाणा येथील पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविली. त्यानंतर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिलेल्या आदेशानुसार गाडगेनगर पोलिसांत भादंवि कलम ४९८ (अ), ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.