पोलिसांच्या ‘भंगार’ वाहनांचा ई लिलाव
By admin | Published: July 14, 2015 03:20 AM2015-07-14T03:20:28+5:302015-07-14T03:20:28+5:30
माहूल गावात पाच एकराच्या पोलीस मैदानावर पडून असलेल्या पोलिसांच्या ८०० पेक्षा जास्त वाहनांचा भंगार म्हणून ई लिलाव केला जाणार आहे. पोलीस दलाकडे वाहनांची टंचाई
- डिप्पी वांकाणी,
मुंबई : माहूल गावात पाच एकराच्या पोलीस मैदानावर पडून असलेल्या पोलिसांच्या ८०० पेक्षा जास्त वाहनांचा भंगार म्हणून ई लिलाव केला जाणार आहे. पोलीस दलाकडे वाहनांची टंचाई असल्यामुळे ही वाहने अक्षरश: भंगार होईपर्यंत वापरली गेली, असे शल्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
चोरी-अपघात अशा खटल्यांतील बेवारस अवस्थेत सापडलेली अनेक वाहने पोलीस ठाण्यांच्या शिवारात पडून असतात व त्यांच्यावर कित्येक वर्षे कोणीही मालकी सांगत नाही. अशा वाहनांचाही लिलाव होणार आहे. या वाहनांची निश्चित किंमत तज्ज्ञांनी ठरविल्यानंतर नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या मदतीने हा लिलाव होईल.
‘ही सगळी वाहने एकतर १० वर्षे जुनी किंवा २ लाख ४० हजार किलोमीटर चालविलेली आहेत. आमच्याकडे वाहनांचा तुटवडा असल्यामुळे ही वाहने कुचकामी होईपर्यंत आमचे लोक ती वापरतात. शिवाय नवे वाहन प्रत्यक्ष उपलब्ध होईपर्यंत ही वाहने पुन्हा पुन्हा दुरुस्त करून वापरली जातात, असे एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.
हा अधिकारी म्हणाला, ‘ही वाहने निदान पाच वर्षांपासून भंगार म्हणून पडून आहेत. खरेतर फार पूर्वीच त्यांचा लिलाव व्हायला हवा होता. या वाहनांची विल्हेवाट लावायचे काम कोणीही केले नाही. गेल्या पाच वर्षांत तरी त्यांचा लिलाव झालेला नाही. या वाहनांत पोलिसांच्या जीप्स, कार्स, दुचाकी, व्हॅन्स इत्यादींचा समावेश आहे. पोलिसांच्या मोटार वाहतूक विभागासाठी राखीव असलेल्या मैदानावर या वाहनांचे ढीगच्या ढीग साचले आहेत. या भंगाराचा लिलाव झाल्यानंतर फार मोठी जागा उपलब्ध होऊन तिचा वापर इतर कारणांसाठी करता येईल. अतिरिक्त पोलीस आयुक्त (लोकल आर्म्स) कैसर खालीद म्हणाले, की लिलावात भाग घेणाऱ्यांना प्रारंभी त्यांच्या नावाची आॅनलाइन नोंदणी करून इसारा रक्कम भरावी लागेल. ते झाल्यानंतर लिलावाची तारीख जाहीर केली जाईल. लिलावातून मिळणारा पैसा सरकारकडे जमा होईल. या भंगाराची किमत निश्चित करण्याचे (म्हणजे त्यातून राखीव किमत स्पष्ट होईल) काम सध्या मोटार वाहतूक विभाग करीत आहे, असे खालीद म्हणाले. यापूर्वी सरकारच्या वाहतूक सेवेने पॉवर अँड वर्क्स डिपार्टमेंटसह अशाच प्रकारचा लिलाव केला होता. आम्हीही याच प्रकारे या महिनाअखेर लिलाव करणार आहोत, असे खालीद म्हणाले.