ई-बालभारती मंडळ स्थापन करणार
By admin | Published: May 2, 2015 01:12 AM2015-05-02T01:12:21+5:302015-05-02T01:12:21+5:30
बालभारती मंडळात ई-लर्निंग सुविधा निर्माण करून ई-बालभारती मंडळ स्थापन करण्याचा विचार आहे. त्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
पुणे : बालभारती मंडळात ई-लर्निंग सुविधा निर्माण करून ई-बालभारती मंडळ स्थापन करण्याचा विचार आहे. त्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
समितीत संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, डॉ. अनिल काकोडकर यांचा समावेश करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. बालभारतीमध्ये शालेय पुस्तकांचा अभ्यासक्रम व निर्मिती करण्यात येते. मात्र, त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येईल. केवळ पुस्तकांचे वाचन करण्याऐवजी त्यामध्ये टॅबलेटद्वारे व्हिज्युअल चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना एखादा विषय समजून घेणे सोपे जाईल. त्यासाठी शिक्षण व संगणक क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती तयार करण्यात येणार आहे, असे तावडे यांनी सांगितले.
विश्व संमेलनाच्या खर्चास नकार
साहित्य संमेलनाप्रमाणे विश्व साहित्य संमेलनासाठी शासनाने निधी देण्याची मागणी साहित्य महामंडळाने केली आहे. मात्र, विश्व साहित्य संमेलनाची परदेशवारी शासनाच्या खर्चातून करता येणार नाही. त्यासाठी बाहेरून निधी उपलब्ध करून देता येईल, असा सल्लाही त्यांनी दिला.
विश्व साहित्य संमेलनासाठी दक्षिण अफ्रिकेचे निमंत्रण आले आहे. परंतु, त्यासाठी निम्मा खर्च साहित्य महामंडळाला करावा लागणार आहे. त्यामुळे २५ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. गतवर्षी शासनाने निधी दिला होता. त्यामुळे भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारनेही निधी देण्याची मागणी केली आहे. त्याविषयी तावडे म्हणाले, शासन परदेशवारीसाठी थेट निधी देऊ शकणार नाही. मात्र, बाहेरून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. (प्रतिनिधी)