राम मंदिराचे ई-भूमिपूजन करा - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 06:46 AM2020-07-27T06:46:06+5:302020-07-27T06:46:45+5:30
शिवसेनेच्या मुखपत्रासाठी खा. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत 'राममंदिराच्या भूमीपूजनाला जाणार का?’, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, अजूनही अधिकृत तारीख आलेली नाही. अधिकृत कार्यक्रम कसा असेल त्याची कल्पना नाही. तो कार्यक्रम आल्यानंतर आपण ते ठरवू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ आॅगस्टला अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमीपूजन करावे, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याने नव्याने चर्चेला तोंड फुटले आहे.
शिवसेनेच्या मुखपत्रासाठी खा. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत 'राममंदिराच्या भूमीपूजनाला जाणार का?’, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, अजूनही अधिकृत तारीख आलेली नाही. अधिकृत कार्यक्रम कसा असेल त्याची कल्पना नाही. तो कार्यक्रम आल्यानंतर आपण ते ठरवू, पण लाखो लोकांची जी भावना आहे की तिकडे उपस्थित राहावे. त्यांना तुम्ही कसे अडवणार? कारण तिकडे तो शरयूचा काठच महत्त्वाचा आहे. कारण राममंदिराच्या आंदोलनात तेव्हा शरयूसुद्धा लाल झाली होती, रामभक्तांच्या रक्ताने. राममंदिर हा भावनेचा विषय आहे. ज्या लाखो रामभक्तांना तिथे उपस्थित राहायचे आहे. त्यांचे काय करणार? त्यांना अडवणार की, येऊ देणार? त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार झाला तर? त्यासाठी तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमीपूजन करू शकता, असा सल्ला ठाकरे यांनी दिला. सध्या आपल्याकडे कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे सर्व मंदिरांमध्ये जाण्या-येण्याला बंदी आहे. मी अयोध्येला जाऊन येईन पण लाखो रामभक्त जे उपस्थित राहू इच्छितात, त्यांचं तुम्ही काय करणार, असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.
या सरकारचे भवितव्य विरोधी पक्षनेत्यावर अवलंबून नाही. सरकार पाडायचे तर जरूर पाडा. मी काय फेविकॉल लावून बसलेलो नाही. तुम्हाला पाडापाडी करण्यात आनंद मिळतोय ना. काही जणांना घडवण्यात आनंद असतो, काही जणांना बिघडवण्यात आनंद मिळतो. काहीजण म्हणतायत आॅगस्ट - सप्टेंबरमध्ये सरकार पाडणार. पण मी म्हणतो वाट कशाला बघता? आजच पाडा, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना एकप्रकारे आव्हानच दिले.
मुंबई-नागपूर अशी बुलेट ट्रेन हवी
राज्याला बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मुंबई-नागपूर अशी बुलेट ट्रेन हवी. राजधानी आणि उपराजधानीला जोडणारी बुलेट ट्रेन द्या, जेणेकरून विदर्भाच्या मनात कारण नसताना निर्माण केलेला दुरावा तरी नष्ट होईल, असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध केला.
ज्याची कुवत कमी लेखली, तोच मुख्यमंत्री झाला!
साठाव्या वर्षी मी मुख्यमंत्री झालो असलो तरी याच‘साठी’ केला होता अट्टहास असं नाहीए! हा निव्वळ योगायोग आहे. मला वाटतं, जगात माझंच एकमेव उदाहरण असेल की, ज्याची कुवत सगळ्यात कमी लेखली गेली, तो पक्षाचा सर्वोच्च नेता आणि राज्याचा मुख्यमंत्री झाला, असा टोला ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.
आमचे तीनचाकी तर तुमचे सरकार ३० चाकी!
राज्यात तीनचाकी सरकार असले तरी या सरकारचे स्टेअरिंग माझ्याच हातात आहे. आमचे सरकार तीन चाकी असले तरी ते गरीबांचे वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवड करायची झाली, तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या मागे उभा राहीन.
शिवाय, तीनचाकी सरकार एका दिशेने चालत आहे, मग तुमच्या पोटात का दुखत आहे. केंद्रात किती चाके आहेत. मी जेव्हा गेल्यावेळी एनडीएच्या बैठकीला गेलो होतो; तेव्हा तर ३०-३५ चाके होती. म्हणजे रेल्वेगाडीच! असा टोला ठाकरे यांनी भाजपला लगावला.