ई-कनेक्टिव्हिटीतही तुटला नात्याचा ‘धागा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 04:44 AM2017-08-08T04:44:06+5:302017-08-08T04:44:17+5:30
परदेशात राहणारे ऋतुराज सहानी (४५) हे मोबाइलच्या एका क्लिकवर जगभराच्या संपर्कात होते. मात्र, जगाशी कनेक्ट होताना जन्मदात्या आईशी असलेल्या नात्याचा धागा कधी तुटला, हे त्यांनाच समजले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परदेशात राहणारे ऋतुराज सहानी (४५) हे मोबाइलच्या एका क्लिकवर जगभराच्या संपर्कात होते. मात्र, जगाशी कनेक्ट होताना जन्मदात्या आईशी असलेल्या नात्याचा धागा कधी तुटला, हे त्यांनाच समजले नाही. आई राहात असलेल्या सोसायटीचे मेंटनन्स, लाइट बिल न चुकता मोबाइल बँकिंगने भरणाºया ऋतुराज यांना, त्याच मोबाइलद्वारे वर्ष, सव्वा वर्ष संपर्कात नसलेल्या आईशी दोन घटका बोलावेसे वाटले नाही. आईचा मृदतेह घरात कुजून त्याचा सांगाडा झाला, तरी आई गेल्याचे त्यांना कळलेच नाही.
अंधेरी लोखंडवाला बेल स्कॉट टॉवर या उच्चभू्र सोसायटीतील बंद फ्लॅटमध्ये आशा सहानी (वय ६३ ) यांचा सांगाडा शनिवारी आढळून आला. अमेरिकेतून आलेल्या ऋतुराज सहानी यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर, हा प्रकार
उघडकीस आला. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी सहानी यांचा मुलगा ऋतुराज याचा जबाब नोंदविला. ज्यात सहानी यांनी मुलाला ‘तू माझी काळजी करू नकोस, मी वृद्धाश्रमात निघून जाईन,’ असे सांगितले होते. १९९७ पासून ऋतुराज हे अमेरिकेत वास्तव्यास आहेत. २० एप्रिल, २०१६ रोजी त्यांचे
आईसोबत शेवटचे बोलणे झाले
होते.
२०१३ मध्येच आशा यांनी मोलकरणीला कामावरून काढून टाकले, तसेच पेपरवाला
आणि दूधवाल्यालादेखील येऊ नको, असे सांगितले होते. त्यांचा मुलगा सोसायटीचे मेंटेनन्स, लाइट बिल मोबाइल बँकिंगने भरत होता. मात्र, २० एप्रिलनंतर वर्षभर आशा आणि ऋतुराज यांच्यात काहीच संपर्क झाला नव्हता. आई वृद्धाश्रमात गेली असावी, त्यामुळे तिने फोन बंद केला
असावा, असे त्यांना वाटल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
तसेच आशा यांनी त्यांच्या घराची चावीदेखील शेजारी अथवा
नातेवाईक अशी कोणाकडेच
दिली नव्हती. त्यामुळे शेजाºयांनीदेखील दरवाजा उघडून पाहण्याचे कारण नव्हते. त्यामुळे अजूनही आशा
सहानी यांच्या मृत्यूचे गूढ कायम असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय
‘आशा सहानी यांचे शवविच्छेदन सोमवारी करण्यात आले. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप उघड झालेले नाही,’ अशी माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी दिली. आशा सहानी यांचे कपडे कुठेही फाटलेले नाहीत, त्यामुळे मृत्युपूर्वी झटापट झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत नाही.
कदाचित झोपेत त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला असेल, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून, तपास अधिकारी न्यायवैद्यक प्रयोग शाळेच्या अहवालाची वाट पाहात आहेत.
कुजलेल्या मृतदेहाची दुर्गंधी कशी आली नाही?
आम्हाला कसलीच दुर्गंधी आली नाही, असे शेजाºयांनी पोलिसांना सांगितले. मात्र, सहानी यांच्या घराचे व्हेंटिलेशन अत्यंत व्यवस्थित आहे. त्यामुळे घरात कुजलेल्या मृतदेहाचा उग्र वास शेजाºयांना कसा आला नाही, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.