मोबाईल अॅपव्दारे ई पीक पाहणी अहवाल : राज्य सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 02:03 PM2018-12-19T14:03:05+5:302018-12-19T14:04:05+5:30
पुणे जिल्ह्यातील बारामतीसह राज्यातील सहा तालुक्यातील पिकांचे नमुने या अॅपवर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
- राहूल शिंदे -
पुणे: शेतक-यांकडून घेतल्या जाणा-या पिकांची अचूक स्थिती सध्या वापरल्या जाणा-या पध्दतीमुळे कृषी व महसूल विभागाकडे प्राप्त होत नाही. त्यामुळे कोणत्या पिकांची किती पेरणी झाली किती उत्पादन होईल, कोणत्या भागातील पिकांचे दुष्काळ,गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झाले,याबाबतची माहिती शासनाला उपलब्ध होत नाही. परंतु,राज्य शासनाने मोबाईल अॅपद्वारे ई-पिक पाहणी अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला असून पुणे जिल्ह्यातील बारामतीसह राज्यातील सहा तालुक्यातील पिकांचे नमुने या अॅपवर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शेतक-यांनी पेरलेल्या पिकांची आणि पिकांच्या स्थितीची नोंद तलाठी कार्यालयात ठेवली जाते.एका तलाठ्याकडे ८ ते १० हजार गट असतात.त्यामुळे एका तलाठ्याला सर्व ठिकाणी जावून पिकांची नोंद करणे शक्य होत नाही.परिणामी शासनाकडे पिक परिस्थितीची खरी माहिती उपलब्ध होत नाही.परिणामी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी खरी माहिती प्राप्त होत नाही.त्यामुळे अत्याधुनिक पध्दतीने मोबाईल अॅपद्वारे ई पीक पाहणी केली जाणार आहे. जीपीएस प्रणालीचा वापर करून फोटो संबंधित पिकाचे छायाचित्र मोबाईल अॅपवर अपलोड करण्यात येणार आहे. स्वत: शेतकरी हे अॅप डाऊनलोड करून त्यावर पिकांच्या नोंदी करू शकेल.
राज्य शासनाला टाटा ट्रस्टतर्फे हे मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले जात आहे. तलाठी कार्यालयाकडून शेतक-यांना नोंदणी बाबत मार्गदर्शन केले जाईल. शेतक-यांनी नोंदविलेल्या माहितीची तपासणी तलाठी करतील. त्यानंतर संबंधित माहिती शासनाला समबिट करतील. परिणामी शासनाला खरी आणि अचूक माहिती प्राप्त होईल. त्यामुळे कोणत्या पिकांची पेरणी किती क्षेत्रावर झाली आहे.त्यातून किती उत्पादन मिळू शकेल. त्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. या संदर्भातील नियोजनपूर्व निर्णय घेणे शासनाला शक्य होईल.
सध्य स्थितीत पिक पेरणीच्या नोंदी लेखी स्वरुपात केल्या जातात.शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पिक पेरणी नोंदीचा दाखला आवश्यक असतो. मात्र, तलाठी कार्यालयाकडून एकाच सातबारा उता-यावर विविध पिकांच्या नोंदी केल्या जातात.परंतु,आॅनलाईन नोंदणीमुळे पिक पेरणी दाखल्यात बदल करता येणार नाही.त्याचप्रमाणे कृषी विभागातर्फे विविध पिकांचे कोड निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ती पूर्ण होणार आहे.त्याचा फायदा या अॅपमध्ये पिकांची नोंदणी करण्यासाठी होईल,असे महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले.
...............
टाटा ट्रस्ट तर्फे ई पिक पेरणीसाठीचे अॅप तयार करून दिले जात असून सध्या ते टेस्टींग फेजह्णमध्ये आहे. राज्यातील सहा विभागातील सहा तालुक्यांची पिक पेरणीची माहिती प्रायोगिक तत्त्वावर भरून घेतली जात आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील बारामती, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पालघरमधील वाडा,औरंगाबादमधील फुलंबरी, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि नागपूर जिल्ह्यातील कामाठी या सहा तालुक्यांचा यात समावेश आहे.