खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारकच; गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 08:24 AM2020-08-24T08:24:40+5:302020-08-24T08:25:33+5:30
मुख्यमंत्री ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर गृहमंत्र्यांची ट्विटरद्वारे माहिती
मुंबई: केंद्र सरकारनं राज्यांतर्गत वाहतुकीवरील सर्व निर्बंध हटवले आहेत. मात्र महाराष्ट्रात खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारक असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-पासची अट हटवण्याची मागणी जोर धरत होती. मात्र ई-पास कायम राहणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करून ई-पासबद्दलचा निर्णय घेऊ, अशी माहिती देशमुखांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर देशमुखांनी पुन्हा ट्विट केलं. 'मिशन बिगिन अंतर्गत जारी असलेली नियमावली पुढील सूचना जाहीर होईपर्यंत कायम असेल,' असं देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ई-पाससह सध्या लागू असलेले सर्व नियम कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे यापुढेही राज्यात खासगी वाहनांमधून प्रवास करताना ई-पास बंधनकारक असेल.
As per the discussions held with Hon'ble CM, the existing #MissionBeginAgain guidelines will be in effect in Maharashtra, till any further announcement. https://t.co/yMc7GSmORl
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) August 23, 2020
केंद्र सरकारनं कोविडच्या लॉकडाऊनसंदर्भात दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करताना राज्याराज्यांनी तेथील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. राज्य शासनानं काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी करताना स्थानिक स्वराज्य संस्थांना (महापालिका, नगरपालिका आदी) तेथील परिस्थिती बघून निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे राज्य शासनानं ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला तरी ई-पास राज्यात सगळीकडेच रद्द होतील असं नाही. काही ठिकाणी ई-पासची सक्ती राहू शकते. राज्य शासनानं आदेश काढूनही त्यांची अंमलबजावणी न करता वेगळे निर्णय लॉकडाऊनच्या काळात काही भागात यापूर्वीही घेण्यात आले आहेत.