‘ई-कचरा’ साठलाय, ‘नो टेन्शन’ !
By admin | Published: January 11, 2017 06:54 PM2017-01-11T18:54:13+5:302017-01-11T18:54:13+5:30
भविष्यातील प्रदुषणात सर्वात मोठा घटक ठरु शकणा-या ‘ई-कच-या’चा धोका नागपुरलादेखील जाणवू लागला आहे. सर्वात जास्त ‘ई-कचरा’ तयार होणा-या देशांतील मोठ्या शहरांत नागपूर
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.11 - भविष्यातील प्रदुषणात सर्वात मोठा घटक ठरु शकणा-या ‘ई-कच-या’चा धोका नागपुरलादेखील जाणवू लागला आहे. सर्वात जास्त ‘ई-कचरा’ तयार होणा-या देशांतील मोठ्या शहरांत नागपूर दहाव्या क्रमांकावर आहे. हीच बाब लक्षात ठेवून मैत्री परिवार, नागपूर महानगरपालिका व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोककल्याण समितीने पुढाकार घेतला आहे. संक्रांतीचा मुहूर्त साधून १५ जानेवारी रोजी उपराजधानीत ‘ई-कचरा मुक्त नागपूर’ या मोहिमेची सुरुवात करण्यात येणार आहे.
शहरातील विविध ठिकाणी ‘ई-कचरा’ संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी मैत्री परिवार संस्थेचे सचिव प्रमोद पेंडके, प्रा.विजय शहाकार, मकरंद पांढरीपांडे, विष्णू मनोहर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
संपूर्ण वर्षभर ही समस्या सोडविण्यासाठी जनजागृती व कृतिकार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवाय शाळा-महाविद्यालयांचीदेखील मदत घेण्यात येणार आहे. संपूर्ण शहरात विविध ‘झोन’निहाय संकलन केंद्र उभारण्यात येतील. नागपूर मनपानेदेखील ई-कचरा संकलनासाठी जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
१५ जानेवारीपासून शंखनाद....
१५ जानेवारीपासून दक्षिण-पश्चिम नागपुरातून ई-कचरा संकलनाची सुरुवात होणार आहे. पत्रकार सहनिवास येथील साई श्रद्धा लॉन येथून मोहिमेचे उद्घाटन होईल. कामाच्या गोष्टी बाजूला सारुन उर्वरित ई-कचरा विघटनासाठी पुण्यातील एका कंपनीकडे पाठविण्यात येणार आहे. महिन्याचे पहिले ५ दिवस दुपारी १२ ते ४ या वेळेत शहरातील १० ‘झोन’मध्ये संकलन करण्यात येईल. सोबतच मैत्री परिवार संस्थेचीदेखील संकलन केंद्र प्रत्येक ‘झोन’मध्ये असतील. संकलनासाठी तांत्रिक तज्ज्ञ उपस्थित राहतील व सुरक्षेचीदेखील काळजी घेण्यात येईल. यात पोलीस विभागाकडूनदेखील सहकार्य मिळेल, अशी माहिती देण्यात आली.