‘ई’ वॉर्ड - शिवसेनेचा ‘अभासे’सोबत काडीमोड!
By admin | Published: January 30, 2017 09:49 PM2017-01-30T21:49:52+5:302017-01-30T21:49:52+5:30
दक्षिण मुंबईतील अधिक चर्चेचा वॉर्ड म्हणून ओळख असलेल्या ‘ई’ वॉर्डमध्ये यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत अधिक चुरस पाहायला मिळणार आहे.
चेतन ननावरे/मुंबई : दक्षिण मुंबईतील अधिक चर्चेचा वॉर्ड म्हणून ओळख असलेल्या ‘ई’ वॉर्डमध्ये यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत अधिक चुरस पाहायला मिळणार आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत याठिकाणी काँग्रेस, शिवसेना, अखिल भारतीय सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्वच पक्षांचे वर्चस्व दिसले होते. मात्र यंदा भारतीय जनता पक्षासोबत काडीमोड घेण्याच्या विचारात असलेली शिवसेना अखिल भारतीय सेनेसोबतची युतीही तोडण्याचा विचार करत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. तसे झाल्यास अभासेसमोरील समस्या वाढणार असून सर्वच राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
प्रभागरचनेत झालेल्या बदलाचा सर्वात मोठा फटका ‘ई’ वॉर्डला बसला आहे. गेल्यावेळी वॉर्डमध्ये एकूण आठ नगरसेवक पदांसाठी निवडणुका रंगल्या होत्या. मात्र यंदा वॉर्डमधील एक प्रभाग दुसऱ्या वॉर्डमध्ये सरकला आहे. त्यामुळे केवळ सात प्रभागांसाठी निवडणुका रंगणार आहेत. २०१२ सालच्या महापालिका निवडणुकीनुसार ई वॉर्डमध्ये काँग्रेसचे तीन, शिवसेनेचे दोन, अभासेचे दोन आणि मनसेचा एक नगरसेवक होता. तर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. याउलट काँग्रेस आणि सेनेच्या प्रत्येकी एका उमेदवारालाही मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. लोकसभा आणि विधानसभेतील मतांची संख्या पाहता, तूर्तास काँग्रेसला तरी याठिकाणी आहे त्या जागेवरील सत्ता टिकवण्याचे आव्हान असेल.
नव्या प्रभागरचनेनंतर वॉर्डमध्ये अनुसुचित जाती आणि इतर मागास वर्गीय उमेदवारांसाठी प्रत्येकी एक प्रभाग राखीव झाला आहे. तर तब्बल पाच खुले प्रभाग निर्माण झाले आहेत. खुल्या प्रभागांमधील दोन प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे याठिकाणी इच्छुकांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. परिणामी नाराजांची संख्या वाढून आयाराम-गयारामांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.
...................
‘अभासे’ची वाट बिकट!
प्रभागांत झालेल्या बदलाचा सर्वाधिक फटका अभासेला बसण्याची शक्यता आहे. कारण गीता गवळी आणि वंदना गवळी या दोन्ही नगरसेविकांच्या प्रभागात बरेच बदल झाले आहेत. त्यात गेल्यावेळी अपक्ष राहत गवळी यांना बऱ्यापैकी टक्कर दिलेल्या रोहिदास लोखंडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याशिवाय विधानसभेत गवळी यांच्या प्रभागातून खोऱ्याने मते मिळवलेल्या आॅल इंडिया मजलीस-ई-इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीचे (एआयएमआयएम) आव्हानही गवळी यांच्यासमोर राहील.
...............................
मनसे डोके वर काढणार का?
गेल्या निवडणुकीत एक जागा जिंकून मनसेला याठिकाणी दोन जागांवर थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. नव्या प्रभाग रचनेला फायदा शिवसेनेसोबत मनसेलाही होणार आहे. त्यामुळे अभासेसोबत युती तोडल्यानंतर शिवसेना किंवा मनसेच्या जागांत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
........................
राणीबागेचा मुद्दा गाजणार!
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणी बाग हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले प्राणिसंग्रहालय ‘ई’ वॉर्डमध्ये येते. राणीबागेचा रखडलेला पुनर्विकास आणि नुकताच मरण पावलेला पेंग्वीन हे पालिका निवडणुकीत कळीचे मुद्दे ठरतील. याशिवाय मातंग समाजाची मते मिळवण्यासाठी राणीबागेतील अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचा विषयही राजकीय पक्षांकडून वापरला जाईल.
...................
२०१२ साली ई वॉर्डातील विजयी आणि पराभूत उमेदवार
वॉर्डविजयी उमेदवार प्राप्त मतेपराभूत उमेदवार प्राप्त मते
२०२समिता नाईक (मनसे) ९,३०९स्मिता बनसोड (राष्ट्रवादी काँग्रेस)६,९४०
२०३रमाकांत रहाटे (शिवसेना) ९,९८५नितिन केरकर (मनसे) ८,६१४
२०४वंदना गवळी (अभासे) ८,२७९रोहिदास लोखंडे (अपक्ष) ५,२५७
२०५गीता गवळी (अभासे) ९,१३८अब्दुल काजी (काँग्रेस) ४,३४०
२०६फैय्याज खान (काँग्रेस) १०,८६०भारतकुमार जैन (भाजप) २,७२२
२०७यामिनी जाधव (शिवसेना)७,१५६हर्षदा सुर्वे (राष्ट्रवादी काँग्रेस)६,१०४
२०८मनोज जामसुतकर (काँग्रेस)७,५८१यशवंत जाधव (शिवसेना)४,५४६
२०९शहाना खान (काँग्रेस) ६,५९६आशा मामिडी (मनसे) ६,२३१
........................................................................................................................................
प्रभाग क्रमांक- २०७
आरक्षण खुला (महिला)
एकूण लोकसंख्या : ५३,८४८
अनुसूचित जाती : ५,२५३
अनुसूचित जमाती : ३३७
प्रभागाची व्याप्ती : कस्तुरबा रूग्णालय, भायखळा रेल्वे स्थानक, डॉ. कंपाऊंड
.........................................
प्रभाग क्रमांक- २०८
आरक्षण खुला
एकूण लोकसंख्या : ५७,१२१
अनुसूचित जाती : २,१५२
अनुसूचित जमाती : ३४७
प्रभागाची व्याप्ती : फेरबंदर, जीजामाता उद्यान, घोडपदेव, ठक्कर इस्टेट
..............................
प्रभाग क्रमांक- २०९
आरक्षण खुला
एकूण लोकसंख्या : ५५,६२२
अनुसूचित जाती : ३,३५५
अनुसूचित जमाती : ९२६
प्रभागाची व्याप्ती : दारुखाना, एकता नगर, वाडी बंदरव अंजिरवाडी,
..........................
प्रभाग क्रमांक- २१०
आरक्षण अनुसुचित जाती (महिला)
एकूण लोकसंख्या : ५२,०७०
अनुसूचित जाती : ५,८७८
अनुसूचित जमाती : ४२९
प्रभागाची व्याप्ती : जे.जे. रूग्णालय, ताडवाडी, मुस्तफ्फा बाजार
.......................
प्रभाग क्रमांक- २११
आरक्षण इतर मागासवर्ग
एकूण लोकसंख्या : ५९,६४१
अनुसूचित जाती : ४१०
अनुसूचित जमाती : ११४
प्रभागाची व्याप्ती : मदनपुरा, न्यू नागपाडा, भायखळा अग्निशमन दल केंद्र
................
प्रभाग क्रमांक-२१२
आरक्षण खुला (महिला)
एकूण लोकसंख्या : ५६,२७८
अनुसूचित जाती : २,१७८
अनुसूचित जमाती : १४१
प्रभागाची व्याप्ती : आग्रीपाडा, आर.टी.ओ., भायखळा (प), वाय.एम.सी. मैदान
.......................
प्रभाग क्रमांक- २१३
आरक्षण खुला
एकूण लोकसंख्या : ५८,२८७
अनुसूचित जाती : २,९६६
अनुसूचित जमाती : ३१३
प्रभागाची व्याप्ती : काजीपुरा, सिद्धार्थनगर, छोटा सोनापुर
..................