पूर्वी साधने नव्हती; पण उत्साह होता

By admin | Published: February 6, 2015 11:53 PM2015-02-06T23:53:49+5:302015-02-07T00:07:16+5:30

आठवणींना उजाळा : विठ्ठलराव याळगी यांनी उलगडला पट

Earlier there were no devices; But there was excitement | पूर्वी साधने नव्हती; पण उत्साह होता

पूर्वी साधने नव्हती; पण उत्साह होता

Next

प्रसन्न पाध्ये - बेळगाव  -(बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी) पूर्वीच्या काळी नाट्य संमेलनात तांत्रिक उपकरणांचा अभाव होता; पण उत्साह मोठा होता, अशी भावना नव्वदीच्या उंबरठ्यावर पोहोचलेले ज्येष्ठ रंगकर्मी विठ्ठलराव याळगी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. बेळगावात ५८ वर्षांपूर्वी झालेल्या नाट्य संमेलनाचे ते साक्षीदार आहेत.
नाटकांचे सादरीकरण ५०-६० वर्षांपूर्वी कसे व्हायचे, कोणती नाटके सादर झाली, स्थानिक रंगकर्मींनी गद्य, पद्य नाटकांच्या स्पर्धेत कशी बक्षिसे मिळविली, याच्या आठवणीत काही काळ याळगी रमले. १९२७ मध्ये स्थापन झालेल्या वाङ्मय मंडळातर्फे १९४५ मध्ये नाट्य महोत्सव भरविला होता. त्यावेळी सात-आठ नाटकांचे प्रयोग झाले होते.
१९५२ मध्ये प्रा. गो. म. वाटवे यांनी स्थापलेल्या कलोपासक मंडळातर्फे ३८वे संमेलन बेळगावात १९५६ मध्ये झाले होते. तो महोत्सव अलौकिक ठरला. त्याकाळी पुरेशी साधने नसली तरी नाट्य महोत्सव, संमेलन घेण्यात उत्साह असायचा.
मध्यंतरीच्या काळात नाट्य महोत्सवाच्या आयोजनात मरगळ आल्यासारखे वाटते. १९५६ नंतर बेळगावात नाट्य संमेलन झालेच नाही.
अनेक वर्षांपासून बेळगावातील कलावंत स्थानिक पातळीवर नाट्यनिर्मिती करीत आहेत. स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. बेळगावातील हौशी कलाकारांनी १९८४ मध्ये ‘संगीत सौभद्र’ नाटक बसविले होते. याचे दिग्दर्शन आजच्या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. अशोक साठे यांनी केले होते. दिल्लीत संगीत नाटकांच्या स्पर्धेत हे नाटक सादर केले होते. या नाटकातील कलाकारांना सात वैयक्तिक पारितोषिके मिळाली होती. डॉ. साठे यांनीच दिग्दर्शित केलेले ‘संगीत संशयकल्लोळ’ दिल्लीतील स्पर्धेत सादर झाले. त्याला पहिला क्रमांक मिळाला. तसेच सहा वैयक्तिक पारितोषिकेही मिळाल्याची आठवण याळगी यांनी सांगितली.
‘सौभद्र’ची दिल्लीतील आठवण त्यांनी सांगितली. बेळगावातील नाट्य संस्था दिल्लीत प्रयोग करीत आहे हे त्यावेळी रेल्वेमंत्री असलेल्या मधु दंडवते यांना समजली. त्या दिवशी त्यांनी सर्व कलाकारांना त्यांच्या घरी जेवणासाठी बोलाविले. तो दिवस विजयादशमीचा होता. प्रतिभाताई सुद्धा त्यावेळी उपस्थित होत्या. श्रीखंड-पुरीचे जेवण झाल्यानंतर डॉ. साठे आणि संगीता बांदेकर-कुलकर्णी यांचे गायन झाले होते.
१५ जुलै ही बालगंधर्वांची पुण्यतिथी व ५ नोव्हेंबर या रंगभूमी दिनानिमित्त वाङ्मय मंडळातर्फे नाटिका, गाण्यांचे कार्यक्रम होतात. बालगंधर्वांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या कन्येचे गायन झाल्याची आठवण त्यांनी सांगितली.
बेळगावात झालेल्या नाट्य संमेलनात परिसंवाद नव्हतेच. चार-पाच नाटके रोज सादर केली जायची. मुंबई-पुण्याच्या कलाकारांसह स्थानिकांचाही यात सहभाग असे. त्या काळी सरकार वेगळे होते. बंधने नसत. यंदाचा महोत्सव सरकारच्या बंधनात अडकलेला आहे. कुठले ठराव करायचे, करायचे नाहीत यावर बंधने घातली आहेत. त्याकाळी भाषिक वादही नव्हता. सांस्कृतिक कार्यक्रमांना कुठली बंधने असू नयेत, अशी अपेक्षा असल्याचे याळगी म्हणाले.
संयुक्त महाराष्ट्रासाठी दंडवते यांनी सत्याग्रह केला होता. त्या आठवणीला उजाळा देताना ते म्हणाले, ‘दंडवते रेल्वेमंत्री झाल्यानंतर दिल्लीत त्यांच्या भेटीचा योग आला. त्यावेळी दंडवते यांनी ‘आता चौकट घालून दिली आहे, त्यामुळे या मुद्द्यावर बोलता येणार नाही’, असे सांगितले

Web Title: Earlier there were no devices; But there was excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.