अ'नाथ', पक्षाच्या होर्डिंग्सवरुन एकनाथ खडसे गायब
By admin | Published: June 12, 2016 02:33 PM2016-06-12T14:33:50+5:302016-06-12T14:33:50+5:30
नाशिक येथे लावण्यात आलेल्या पोस्टर वर फडणवीस, गडकरी, दानवे यांच्यापासून स्थानिक सर्व नेते मंडळींचे फोटो लावण्यात आले होते. मात्र, एकाही पोस्टरवर एकनाथ खडसे दिसत नव्हते.
Next
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १२ : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा देऊन आठवडा उलटला नाही, तोच भाजपाच्या होर्डिंग्सवरुनही खडसे गायब झाल्याचे दिसून येत आहे. पक्षाला त्यांचा विसर पडला का असा सवाल माध्यमातून आणि सर्वसामान्य जनतेतून केला जात आहे. तर महसूल मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागल्यावर भाजप एकनाथ खडसे यांच्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याची जोरदार चर्चा भाजप आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. हा प्रकार भाजपने नाशिक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात घडला.
नाशिकच्या वसंत स्मृती येथील भाजप कार्यालयात अनुसूचित जमात मोर्चा विस्तार व पदग्रहण समारंभ सोहळ्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आले होते. या कार्यक्रमासाचे मोठ्या उस्ताहात आयोजन करण्यात आले होते. त्यात भाजपने लावलेली कार्यक्रमाची पोस्टर्सही उठून दिसत होती. मात्र, संपूर्ण कार्यक्रमभर कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा सुरू होती. ती म्हणजे भाजपच्या पोस्टर्सवरून एकनाथ खडसे यांचे गायब होणे.
नाशिक येथे लावण्यात आलेल्या पोस्टर वर फडणवीस, गडकरी, दानवे यांच्यापासून स्थानिक सर्व नेते मंडळींचे फोटो लावण्यात आले होते. मात्र, एकाही पोस्टरवर एकनाथ खडसे दिसत नव्हते.
दरम्यान, याबाबत मंत्री सावरा यांच्याकडे प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता, ‘चूक झाली असेल तर दुरुस्ती करू’, असे सांगत त्यांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच, ‘एकनाथ खडसे हे राज्यातील मोठे नेते आहेत. ते ४० वर्षे राजकारणात आहेत. त्यांच्याबद्दल आकस नसून प्रोटोकॉलनुसार त्या त्या वेळी वागावं लागतं’, असेही त्यांनी या वेळी सांगितलं.