भूकंपग्रस्तांसाठी बुलेटवरून सातारा ते काठमांडू!
By admin | Published: August 19, 2015 09:33 PM2015-08-19T21:33:38+5:302015-08-20T09:21:57+5:30
भटकंती एका दानशूराची : ‘सेफ नेपाळ-सेव्ह नेपाळ’साठी प्रयत्न
प्रदीप यादव- सातारा शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनी नेपाळमध्ये मोठी हानी झाली. बसंतपूर येथील दरबार स्क्वेअर हे पर्यटकांचे आकर्षणस्थळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. पर्यटन हेच उत्पन्नाचे साधन असलेल्या नेपाळवासीयांनी दिलेल्या ‘सेफ नेपाळ-सेव्ह नेपाळ’ हाकेला साद देत सातारच्या एका दानशूर युवकाने सातारा ते काठमांडू असा बुलेटवरून प्रवास करीत आर्थिक मदत केलीच. शिवाय पर्यटकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी जागृतीफेरीही काढली.
साताऱ्यातील कृष्णानगर येथील तुषार जोगळेकर हा ३४ वर्षीय युवक गेली चार वर्षे नेपाळमध्ये पर्यटनासाठी जात होता. तेथील निसर्गाने आणि स्थापत्यकलेने त्याला जणू भुरळच घातलेली. काही महिन्यांपूर्वी नेपाळमधील अनेक शहरे भूकंपाच्या धक्क्यांनी उद्ध्वस्त झाली. जगभरातून नेपाळवासीयांना मदतीचा हात देण्यात आला. मात्र, ज्या देशाने आपल्या अतीव सौंदर्याने पर्यटकांची मने रिझविली, त्याच्या उभारणीसाठी आपणही काही देणे लागतो, या बांधिलकीतून तुषारने आयुष्यात प्रथमच बुलेटवरून ‘सातारा ते नेपाळ’ असा थरारक प्रवास करत नेपाळवासीयांच्या मदतीला धावून गेला. विशेष म्हणजे, सातारा ते नेपाळ हा २ हजार ४०० किलोमीटरचा प्रवास त्याने पाच दिवसांत पूर्ण केला. सोबत होत्या फक्त गरजेपुरत्याच वस्तू.
‘सेफ नेपाळ-सेव्ह नेपाळ’ याविषयी विचारले असता तुषारने सांगितले की, नेपाळवासीयांसाठी पर्यटन हेच एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. भूकंपामुळे तिथे मोठी हानी झाली आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेली अनेक ठिकाणं कोसळली आहेत. जगभरातून मदतीचा हात आला आहे; परंतु पुन्हा उभारी घेण्यास काही काळ लागेल. भूकंपामुळे तेथील पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. पर्यटकांच्या मनात भीतीने घर केले आहे. त्यामुळे लोक बेरोजगार झाले आहे. जगाच्या नकाशावरील स्वच्छ अन् सुंदर नेपाळ पुन्हा उभे राहावे, यासाठी ‘सेफ नेपाळ-सेव्ह नेपाळ’ची हाक नेपाळवासीयांनी दिली आहे. त्यांच्या या हाकेला धावून जात मीही त्यांच्यात सहभागी होऊन आता नेपाळ सुरक्षित आहे. घाबण्याचे कारण नाही. तुम्ही पर्यटनाला या.. असा संदेश रॅलीच्या माध्यमातून दिला.
घरे उद्ध्वस्त;
तंबूत संसार
विध्वंसक भूकंपात मोठमोठ्या इमारतींसह घरेही जमीनदोस्त झाली आहेत. जगभरातून आलेल्या मदतीत अनेक देशांनी चांगल्या प्रतीचे कापडी तंबू दिले आहेत. त्यामध्ये लोकांनी आपला संसार थाटला आहे. आपला देश पुन्हा नव्याने उभारू, या जिद्दीने लोक झटत आहेत. घरे कोसळली असली तरी माणसं कोसळली नाहीत, हे त्यांच्या इच्छाशक्तीवरून पाहायला मिळाले.
साताऱ्यात
जल्लोषी स्वागत
तुषारचा मित्रपरिवार मोठा आहे. आपल्या स्वभावामुळे जिथे जाईल तिथे त्याने मित्र जोडले आहेत. अगदी नेपाळमध्येही त्याचे तीसेक मित्र आहेत. हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आणि मनस्वी जीवन जगणाऱ्या तुषारने ‘सातारा ते नेपाळ’ हा बुलेट प्रवास करण्याचे ठरविले तेव्हा मित्रांनी त्याला प्रोत्साहन दिले. तो जेव्हा परत आला तेव्हा साताऱ्यातील नाका ग्रुपने केक कापून तुषारचे जल्लोषी स्वागत केले.
रोमांचकारी प्रवास
नेपाळहून परतत असताना मार्ग बदलला. या मार्गावरील प्रवास जेवढा आनंददायी तेवढाचा थरारक होता. कधी नदीतून, कधी दगड धोंड्यांतून तर कधी चकाचक रस्त्यावरून प्रवास करताना ठिकठिकाणी धोक्याची सूचना असलेले फलक पाहायला मिळत होते. लेह-मनाली रस्त्याने प्रवास करताना कधी वाळवंट तर कधी बर्फाच्छादित प्रदेश अशा वातावरणातील प्रवास कठीण होता. मिल्ट्रीच्या छावण्या, बंदूकधारी भारतीय जवान, कारगिल रणभूमी, पाहून ऊर भरून येत होता. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या सीमा डोळ्यांसमोर दिसत होत्या. ‘सावधान... दुश्मन आपको देख रहा हैं, असे सूचना फलक रस्त्यावर पाहायला मिळत होते.
नेपाळवासीयांना स्वच्छतेची शिस्त
गेल्या चार वर्षांपासून नेपाळची सहल करीत आहे. त्याठिकाणी अनेक मित्र झाले आहेत. तेथे जाणवलेली एक गोष्ट म्हणजे नेपाळमध्ये चोरी कधी होत नाही आणि लोकांना स्वच्छतेची प्रचंड आवड आहे. आपले घर, परिसर स्वच्छ असावा, या भावनेतून ते स्वत:हून कचरा साफ करत असतात.
नेपाळची राजधानी काठमांडू येथे वीस दिवस राहिलो. लोकांच्या मिसळून पर्यटकांमध्ये असलेली भीती दूर व्हावी, यासाठी रॅली काढून जागृती केली अन् पन्नास हजार रुपयांची मदतही केली. नैसर्गिक संकटाचा फटका बसलेल्या एका देशाला सावरण्यासाठी मीही काही करू शकलो, यात मोठे समाधान मिळाले.
- तुषार जोगळेकर, सातारा