भूकंप सांगून होत नसतात!
By admin | Published: March 23, 2017 11:54 PM2017-03-23T23:54:18+5:302017-03-23T23:54:18+5:30
माझ्या पक्षांतराबद्दल बातम्या येत आहेत. पण मी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे सांगत या बातम्या पेरण्यांमागे
मुंबई : माझ्या पक्षांतराबद्दल बातम्या येत आहेत. पण मी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे सांगत या बातम्या पेरण्यांमागे काँग्रेसमधील नेत्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. शिवाय, राजकीय भूकंप सांगून होत नसतात, असे सूचक वक्तव्यही केले.
राणे म्हणाले, मतदारसंघातील कामांसाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यावरून लगेच मी भाजपात जाणार अशा वावड्या उठविण्यात आल्या. मी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही आणि कोणताही नेता मला भेटलेला नसताना गेले १५ दिवस माझ्या पक्षांतराची चर्चा सुरू आहे. मी कोणालाही न भेटता अशा बातम्या खात्री न करता पसरवणे चुकीचे आहे, असेही राणे म्हणाले. मात्र, त्याचवेळी अशा बातम्यांमागे पक्षातील काही नेत्यांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पण कोणाचेही नाव घेतले नाही.
आ. नीलेश राणे यांनी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीसपद का सोडले, असे विचारले असता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण निर्णय घेण्यास दिरंगाई करत आहेत, असे उत्तर राणे यांनी दिले.
तर वृत्तवाहिनीशी बोलताना राणे यांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास असल्याचे सांगतानाच पक्षाने आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेतला नाही, अशी खंतही बोलून दाखवली. शिवाय, राज्यातील काही नेते स्वत:च्या स्वार्थापलीकडे पक्षाचा विचार करत नाहीत, अशी तोफही डागली. (विशेष प्रतिनिधी)