पूर्व विदर्भात पूरच पूर, निम्म्या राज्यात पिके आतुर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 06:00 AM2024-07-22T06:00:48+5:302024-07-22T06:01:13+5:30

रस्ते, घरे पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत, तीन जिल्ह्यांचा संपर्क तुटला, मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षाच

East Vidarbha is flooded, crops are in short supply in half of the state | पूर्व विदर्भात पूरच पूर, निम्म्या राज्यात पिके आतुर

पूर्व विदर्भात पूरच पूर, निम्म्या राज्यात पिके आतुर

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तीन दिवसांपासून विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, अतिवृष्टीमुळे रविवारी गडचिरोली, चंद्रपूर व गोंदियात पूरपरिस्थिती निर्माण झाली. अनेक पुलांवर पाणी साचल्याने महामार्ग बंद पडले. गावांचे संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले. असे असले तरी निम्म्या विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

तलाव फुटून ३०० घरांत पाणी
चंद्रपूर : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा, वर्धा, अंधारी, उमा व पिंपळनेरी नद्यांना पूर आला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील मामा तलावाची पाळ फुटल्याने ३०० घरांत पाणी शिरले जिल्हा प्रशासनाकडून मदतकार्य सुरू झाले आहे.

गडचिरोली नागपूर, चंद्रपूरशी संपर्क तुटला 
गडचिरोली : शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे गडचिरोलीचा नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याशी संपर्क तुटला असून, चार राष्ट्रीय महामार्गांसह ३७ रस्त्यांची रहदारी सध्या बंद आहे. भामरागडला पुराचा सर्वाधिक फटका बसला. अनेक दुकाने आणि घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. निम्मे गडचिरोली शहरही पाण्याखाली गेले. पूर परिस्थितीमुळे २२ जुलैला जिल्ह्यातील सर्व शाळा- महाविद्यालयांना सुटी दिली आहे.

पंचगंगा नदीकाठच्या गावांची स्थलांतराची तयारी सुरू 
कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस आला. परिणामी पंचगंगा नदी ३७ फुटांच्या वरून वाहू लागली. पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, स्थलांतराची तयारी सुरू केली आहे, काही तालुक्यांत ढगफुटीसारखा पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील ३३ मार्ग पुरामुळे बंद आले. • रत्नागिरी जिल्ह्यातील चिंचवली (ता. खेड) येथील रामचंद्र सखाराम पवार हे गुरुवारी नदीतून वाहून गेले होते. शनिवारी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

अनेक जिल्ह्यांत अद्यापही पावसाची प्रतीक्षाच
प्रादेशिक हवामान विभागाच्या पावसाच्या अहवालानुसार, अमरावती येथे १२ टक्के, तर गोंदिया जिल्ह्यात ११ टक्के पावसाची तूट आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर असला तरी अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात प्रतीक्षा कायम आहे.

बीड जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या निम्मा म्हणजेच ३३७.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते २० जुलै या ५० दिवसांच्या कालावधीत ५९.६ टक्के पाऊस झाला असतानाही जिल्ह्यातील मोठी धरणे अद्याप तहानलेली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही पावसाने दडी मारल्यामुळे पिकांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहावे : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. इतरही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलिस, महापालिका, नगरपालिका तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. हवामान खाते, आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून वेळोवेळी माहिती घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

कृष्णेची पातळी १८ फुटांवर
काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणीपातळी वाढ झाली. रविवारी सांगलीतील पातळी १८ फुटांवर गेली होती.
कोयना धरणात ५४ टीएमसी
चोवीस तासांत कोयना धरणात साडेतीन टीएमसी पाणीसाठा वाढला. त्यामुळे सध्या ५४.४३ टीएमसी पाणीसाठा झाला.

Web Title: East Vidarbha is flooded, crops are in short supply in half of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.