दौंडचा पूर्व भाग पावसाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: June 10, 2016 01:16 AM2016-06-10T01:16:56+5:302016-06-10T01:16:56+5:30
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी नैर्ऋत्य मान्सून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी नैर्ऋत्य मान्सून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. उजनी धरणाचे बॅक वॉटर म्हणजे या भागाला मिळालेले वरदान आहे. या पाण्यावरच हा भाग सुजलाम् सुफलाम् झाला आहे. परंतु, गेल्या ४२ वर्षांत राजेगावमध्ये कधीही न आटणारी भीमा नदीचे पात्र यंदा प्रथमच कोरडे पडले आहे.
परिणामी, या परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाढत्या उन्हामुळे जिवाची तगमग होत असल्याने या भागातील शेतकरी दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. शनिवार (दि. ४) या परिसरात थोडाफार बिगरमोसमी पाऊस पडला. परंतु, या पावसामुळे शेतीला फारसा काही दिलासा मिळाला नाही. या परिसरातील शेतकरी शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून प्रामुख्याने दुग्धव्यवसाय करत आलेला आहे.
परंतु, तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने जनावरांना पाणी आणि चारा देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुष्काळामुळे पोटच्या पोरासारखं जीवापाड सांभाळलेले पशुधन मातीमोल किंमतीत विकण्याची दुर्देवी वेळ बळीराजाच्या नशिबी आली आहे.
७ जूनला मृग नक्षत्र सुरू झाले, की पाऊस पडल्यानंतर या परिसरातील कोरडवाहू शेतीत बाजरीचे पीक घेतले जाते. परंतु, गेली तीन-चार वर्षे मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने या परिसरातील शेतकऱ्याला बाजरी पीक घेता आले नाही. यंदातरी मान्सून वेळेवर येईल आणि बाजरीची लागवड करता येईल, या आशेवर या भागातील शेतकरी आहे. सात दिवसांच्या विलंबाने का होईना, नैर्ऋत्य मान्सून केरळला पोहचला असून मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण तयार झाल्याने शेतकरीवर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
हा परिसर ऊस पिकाचे आगार मानला जातो. पाऊस पडल्यानंतर १ जुलैपासून या परिसरात प्रत्येक साखर कारखान्यांच्या धोरणानुसार आडसाली ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु, यंदा भीमा नदीच्या पात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने कृषीपंप गुंडाळून ठेवण्यात आले आहेत. शिवाय विहीरी आणि कुपनलिका हे पाण्याचे स्रोत केव्हाच आटून गेले आहेत.
राजेगाव येथील शेतकरी गणेश मोरे आणि दीपक धापटे म्हणाले, की सध्या दुष्काळाने पाण्याचे सर्व जलस्रोत आटले आहेत. जनावरांना पाणी आणि चारा उपलब्ध होत नसल्याने दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे वरुणराजाने दिलासा दिला नाही तर शेतकरी उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.