अमेरिकेत जाणे विद्यार्थ्यांना झाले सोपे
By admin | Published: January 8, 2015 01:10 AM2015-01-08T01:10:58+5:302015-01-08T01:10:58+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अमेरिकेतील पेन स्टेट विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक करार झाला
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अमेरिकेतील पेन स्टेट विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक करार झाला असून, त्याअंतर्गत बुधवारी विद्यापीठाच्या आवारात पेन स्टेट विद्यापीठाच्या केंद्राचे उद््घाटन करण्यात आले. यामुळे पुण्यातून पेन स्टेट विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होऊ शकेल. त्याचबरोबर, दोन्ही विद्यापीठांना जागतिक स्तरावरील प्रमुख समस्यांवर संशोधन करून त्यावर मार्ग काढता येईल.
पदवी अभ्यासक्रम, शिक्षक व विद्यार्थांची देवाणघेवाण, एकत्रित संशोधन प्रकल्प, संशोधनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींबाबत सहकार्य त्याचप्रमाणे अभ्यासक्रम तयार करणे व त्यांचे सक्षमीकरण करणे या संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पेन स्टेट विद्यापीठ यांच्यात सुमारे दीड वर्षापूर्वी सामंजस्य करार झाला होता. त्यानुसार बुधवारी पेन स्टेट विद्यापीठाच्या केंद्राचे पुण्यात उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, पेन स्टेट विद्यापीठाचे डॉ. मिशेल अडेवुमी, डॉ. मड्ल्यन हान्स, डॉ. मुकुंद कुलकर्णी, विद्यापीठाच्या महविद्यालय व विद्यापीठ मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते.
यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गाडे यांनी विद्यापीठातील पेन स्टेट केंद्रातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांबाबत माहिती दिली.
(प्रतिनिधी)
सामाजिकशास्त्र, विज्ञान, अभियांत्रिकी या विषयांत दोन्ही विद्यापीठांमध्ये शैक्षणिक व संशोधनात्मक देवाणघेवाण होणार आहे. त्याचप्रमाणे नागरीकरणाच्या प्रभावामध्ये महिलांमध्ये व्हिटॅमन ‘डी’ची कमतरतार आढळत आहे का? तसेच, लठ्ठपणाच्या आजारावर चीन भारत आणि अमेरिका या देशातील तरुणांचे प्रमाण किती आहे, आदी विषयांवर एकत्रित काम केले जाणार आहे. उत्तम शैक्षणिक प्रशासक घडविण्यासाठी विविध अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत.
- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
पेन स्टेट विद्यापीठाच्या केंद्राचे काम पाहण्यासाठी अजित राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पेन स्टेट विद्यापीठातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आलेल्या विद्यार्थांच्या सोयीसाठी व पुण्यातून पेन स्टेट विद्यापीठात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात स्थापन करण्यात आलेले केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.