थकबाकी वसुलीसाठी सुलभ हप्त्यांचा पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 06:28 AM2020-11-21T06:28:29+5:302020-11-21T06:28:51+5:30
३ ते १२ हप्त्यांमध्ये बिल भरण्याची मिळणार मुभा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाढीव वीजबिले आणि कोरोनामुळे झालेल्या आर्थिक कोंडीमुळे लाखो वीज ग्राहकांना बिलांचा भरणा करणे शक्य होत नसून महावितरणची थकबाकी लक्षणीयरीत्या वाढत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना बिलांचा भरणा करण्यासाठी तीन ते बारा सुलभ हप्त्यांचा पर्याय महावितरणच्या वतीने दिला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांसह सध्या चालू बिलांचा एकरकमी भरणा करू न शकणाऱ्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
महावितरणची एकूण थकबाकी ५९ हजार कोटींची असून त्यापैकी ४२ हजार कोटी ही कृषिपंपांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांकडून वीजबिलांची वसुली राजकीय हस्तक्षेपामुळे अडचणीची होत असून उर्वरित १७ हजार कोटींच्या वसुलीसाठी महावितरणकडून नवे धोरण ठरविले जात आहे. यामुळे वीज ग्राहकांना दिलासा मिळण्यची चिन्हे वर्तवण्यात येत आहेतत
असे असेल योजनेचे ढोबळ स्वरूप
लघुदाब, उच्चदाब वीज ग्राहकांसाठी हे धोरण लागू असेल. त्यात कृषिपंपांचा समावेश नसेल. बिलांबाबत कोणताही कायदेशीर वाद नसलेल्या किंवा तो वाद मागे घेण्याची तयारी असलेल्या ग्राहकांना याचा फायदा घेता येईल. चालू बिलाची रक्कम थकल्यास कोणत्याही स्वरूपाचे डाउन पेमेंट करण्याची गरज नसेल. अन्य ग्राहक मात्र ३० टक्के डाउन पेमेंट करून हप्त्यांच्या सुविधेचा फायदा घेऊ शकतील. तीन ते १२ हप्त्यांमध्ये बिल भरण्याची परवानगी दिली जाईल. हप्त्यांच्या कालावधीत दरमहा वीजबिलांचा भरणा नियमित वेळेत करावा लागेल. आर्थिक वर्षात एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्याज आकारणी केली जाईल.