मिरची बियाणे वेगळे करणे झाले सोपे !
By admin | Published: January 5, 2015 11:14 PM2015-01-05T23:14:25+5:302015-01-05T23:14:25+5:30
पीडीकेव्हीने केले मिरची निष्कासन तंत्रज्ञान विकसीत.
राजरत्न सिरसाट /अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राज्यात पहिले मिरची निष्कासन यंत्र विकसीत केले आहे. या तंत्रज्ञानामुळे मिरची आणि बिया वेगळे करणे सोपे झाल्याने या तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने देशात होत आहे.
पारंपरिक पध्दतीमध्ये वाळलेल्या मिरच्या पोत्यात भरू न काठीने बियाणे आणि मिरचीची सालं वेगळे करण्याची पध्दत होती. काठीच्या सहाय्याने पोत्यात बारीक केलेली मिरची हवेच्या झोतात किंवा पंख्याच्या सहाय्याने वेगळी केली जात असत. पारंपरिक पध्दतीने किंवा मजुरांकडून मिरची बियाणे वेगळे करणे त्रासदायक असल्याने दिवसाकाठी केवळ सात ते आठ किलो मळणी केली जायची. मिरची बियाणे कंपन्यांची मागणी बघता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या मार्गदर्शनात कापणी पश्चात तंत्रज्ञान विभागाने नवे मिरची निष्कासन यंत्र विकसीत केले आहे. या यंत्रामुळे एका तासाला १00 किलो मिरची आणि बियाणे वेगळे केले जात असून, प्रतिदिवस १0 ते १५ पोते बियाणे काढण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या यंत्रातून काढल्या जात असलेल्या बियाण्यांची उगवणशक्ती ९0 ते ९५ टक्के असल्याने, या यंत्राची मागणी वाढली आहे. एका खासगी कंपनीने कृषी विद्यापीठाचे हे यंत्र घेतले असून, राज्यात या यंत्राची मागणी तर वाढली आहेच, शिवाय दक्षिण भारतातील राज्यात या यंत्राचा प्रसार सुरू झाला आहे.
या यंत्रामध्ये मिरची धूर बाहेर न पडणारे तंत्रज्ञान असल्याने दिवसभर या यंत्रावर मजूर काम करू शकतात. विजेवर चालणारे हे यंत्र मिरची पावडरही तयार करू शकते. या यंत्राची किमंत ७२ हजार रू पये असल्याने शेतकर्यांना जोड धंदा म्हणून त्याचा वापर करता येणार आहे.राज्यात पहिले मिरची निष्कासण यंत्र विकसीत केले आहे. याच फायदा शेतकर्यांनी घेण्याची गरज आहे. सद्या एका मोठय़ा खासगी कंपनीने हे यंत्र घेतली असून, महाराष्ट्रासह परप्रातांत या यंत्राचा प्रसार सुरू असल्याचे कापणी पश्चात तंत्रज्ञान विभागाचे डॉ. प्रदिप बोरकर यांनी सांगीतले.
*मिरची पावडरसाठी उपयुक्त
बिया वेगळे करणारे मिरची निष्काषण यंत्रातून मिरची पावडर तयार केली जात असून, छोट्या पिशव्यात पॅक करू न मिरची पॅकेट शेतकर्यांना विकता येतात हे विशेष.