खा. श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून लावलेल्या १ लाख वृक्षांची जाळपोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 04:27 PM2017-12-20T16:27:50+5:302017-12-20T16:28:44+5:30
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याण लोकसभा मतदारसंघातील मांगरूळ येथे लोकसहभागातून लावण्यात आलेल्या एक लाख वृक्षांना आग लावण्याचा प्रकार मंगळवारी रात्री काही समाजकंटकांनी केला.
ठाणे - कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याण लोकसभा मतदारसंघातील मांगरूळ येथे लोकसहभागातून लावण्यात आलेल्या एक लाख वृक्षांना आग लावण्याचा प्रकार मंगळवारी रात्री काही समाजकंटकांनी केला. या प्रकारात किमान २० हजार झाडांचे नुकसान झाल्याचा वनविभागाचा अंदाज असून या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून प्रकरणाचा कसून तपास करण्याचे निर्देश पोलिस उपायुक्तांना दिले आहेत.
राज्य सरकारच्या वतीने आयोजित वनसप्ताहाचा मुहूर्त साधत खा. डॉ. शिंदे यांनी लोकसहभागातून एक लाख झाडे लावण्याचा संकल्प सोडला होता. त्यानुसार पाच जुलै २०१७ रोजी विविध क्षेत्रांतल्या तब्बल २० हजार लोकांनी एकत्र येत अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ या गावी वनविभागाच्या जागेवर एक लाख झाडे लावण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले होते. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांच्या काळात खा. डॉ. शिंदे यांनी स्वत: या ठिकाणी जातीने लक्ष घातल्यामुळे सुमारे ९५ टक्के झाडे जगली होती. येत्या पाच वर्षांत या ठिकाणी हिरवागार पट्टा तयार करून नैसर्गिक वन तयार करण्याची खा. डॉ. शिंदे यांची योजना होती.
मात्र, स्थानिक समाजकंटकांनी जमिनी बळकावण्याच्या प्रयत्नांतून मंगळवारी रात्री या ठिकाणी वणवा पेटवल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. उल्हासनगर येथील हिललाइन पोलिस ठाण्यात वनविभाग तसेच खा. डॉ. शिंदे यांच्या वतीने संयुक्त तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा तातडीने तपास लावून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली आहे. तसेच, जी झाडे जळाली आहेत, त्यांच्या जागी नवी झाडे लावण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत पोलिस उपायुक्त अंकित गोयल यांना या प्रकरणाचा तातडीने तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. सहायक पोलिस आयुक्त सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. पलंगे तपास करत आहेत.