इबोलावर ‘अबोला’ का ?
By admin | Published: September 15, 2014 01:05 AM2014-09-15T01:05:26+5:302014-09-15T01:05:26+5:30
इबोला रोगाने भारतात धुडगूस घालता कामा नये, यासाठी नागपूर विमानतळावरही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपाययोजना उभारण्याचे आदेश पाच दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत. परंतु येथील शासकीय
शासकीय रुग्णालयांचे मौन : औषधे, स्वतंत्र कक्षाचा अभाव
सुमेध वाघमारे - नागपूर
इबोला रोगाने भारतात धुडगूस घालता कामा नये, यासाठी नागपूर विमानतळावरही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपाययोजना उभारण्याचे आदेश पाच दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत. परंतु येथील शासकीय रुग्णालयांच्या डॉक्टरांना ‘इबोला’च्या संदर्भात प्रशिक्षण नाही, आवश्यक औषधे उपलब्ध नाही आणि विशेष म्हणजे स्वतंत्र कक्ष नाही. परिणामी, संशयित रुग्ण जरी आढळून आला तरी मोठा धोका होण्याची शक्यता आहे.
जगभरात झपाट्याने पसरणाऱ्या इबोला आजाराचा राज्यात प्रवेश रोखण्यासाठी नागपूर विमानतळावर इबोला तपासणी सुविधा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विमानतळावर मिहान इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत स्क्र ीनिंग सुविधा देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला त्याबाबत सूचना देण्यात आल्याचे विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, आरोग्य विभागाकडून आलेल्या परिपत्रकानंतर मेडिकलशी संपर्क साधण्यात आला होता. रुग्णालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या इबोला तपासणीबाबत मार्गदर्शन करावे, असे सूचित करण्यात आले होते. उपसंचालक आरोग्य विभागाने या संदर्भात शनिवारी बैठकही आयोजित केली होती, परंतु मेडिकलकडून कुणीच उपस्थित नव्हते. यामुळे उपाययोजनेच्या संदर्भात मेडिकल अद्यापही अंधारातच आहे.
मेडिकलमध्ये आधीच संसर्गजन्य वॉर्डाला ग्रहण लागले आहे. या वॉर्डाला शासकीय मंजुरी मिळून तीन वर्षे झालीत. परंतु बांधकाम अद्यापही थंडबस्त्यात आहे. यामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण वैद्यक औषधशास्त्र विभागाच्या वॉर्ड क्रमांक २५ मध्ये ठेवले जातात. या रुग्णांची संख्या कमी असल्याने येथे इतरही रुग्ण भरती असतात. सध्याच्या स्थितीत मेडिकलचा अपघात विभाग ते अतिदक्षता विभाग फुल्ल आहे. यात ‘इबोला’चा संशयित रुग्ण जरी मिळाला तरी त्याला ठेवण्याची सोय मेडिकलमध्ये नाही. यापेक्षा बिकट स्थिती मेयो रुग्णालयाची आहे. सध्या मेडिकलच प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर आहे. यामुळे कोणतीच गोष्ट गांभीर्याने घेतली जात नसल्याचे चित्र आहे.