वाशिम जिल्ह्यात ‘लोकवाहिनी’ला नादुरूस्तीचे ‘ग्रहण’
By admin | Published: September 3, 2016 05:32 PM2016-09-03T17:32:04+5:302016-09-03T17:32:04+5:30
‘महाराष्ट्राची लोकवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणा-या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे
Next
>- सुनील काकडे / ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 3 - ‘महाराष्ट्राची लोकवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणा-या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यातील ४ आगारांतर्गत असलेल्या २०१ बसेसपैकी दैनंदिन दुरूस्तीच्या नावाखाली सुमारे ३५ बसेस आगाराच्या ‘वर्कशॉप’मध्ये तासनतास उभ्या राहत आहेत. परिणामी, ग्रामीण भागासह परजिल्ह्यात प्रवास करणाºयांची प्रचंड गैरसोय होत आहे.
टायर पंक्चर असणे, ‘ब्रेक फेल’, स्प्रिंगपट्टा तुटणे, ‘बॅटरी मेन्टेनन्स’ यासह इतरही गंभीर आणि किरकोळ दुरूस्तीच्या नावाखाली प्रत्येक आगारातील ‘वर्कशॉप’मध्ये बसेस उभ्या असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीदरम्यान निदर्शनास आले. जुनाट झालेल्या अनेक बसेस जिल्ह्यातील रस्त्यांवर ‘फेल’ होवून बंद पडत आहेत, रात्रभराच्या मुक्कामाला आगारात उभ्या राहणाºया बसला सकाळच्या सुमारास धक्का द्यावा लागतो, त्याशिवाय बस सुरूच होत नाही, असा अनुभव प्रवाशांना येत आहे. एकूणच या सर्व कारणांमुळे प्रवाशांमध्ये परिवहन महामंडळाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आगारनिहाय नादुरूस्त असलेल्या बसेस
जिल्ह्यातील चार आगारांतर्गत २०१ बसेस धावतात. त्यात वाशिम आगारात ५९, कारंजा लाड ४४, मंगरूळपीर ४५ आणि रिसोड आगाराकडे ५३ बसेस आहेत. शनिवारी करण्यात आलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान वाशिम आगारातील ‘वर्कशॉप’मध्ये विविध प्रकारचा बिघाड उद्भवल्याने तब्बल १५ बसेस दुरूस्तीकरिता उभ्या होत्या. मंगरूळपीर आगाराच्या वर्कशॉपमध्ये ३, रिसोडमध्ये १०; तर कारंजा आगाराच्या ‘वर्कशॉप’मध्ये यावेळी ७ बसेसची दुरूस्ती सुरू असल्याचे दिसून आले.