अकोटच्या बाजार समितीत होतो ई- लिलाव

By admin | Published: April 8, 2017 01:40 PM2017-04-08T13:40:51+5:302017-04-08T13:46:19+5:30

अकोट शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा, त्यांच्या मालाची लवकर मोजणी होऊन त्यांना मोबदला त्वरित मिळावा, या उदात्त हेतूने अकोट बाजार समितीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे.

Eco-auction takes place in Akot's market committee | अकोटच्या बाजार समितीत होतो ई- लिलाव

अकोटच्या बाजार समितीत होतो ई- लिलाव

Next

ऑनलाइन लोकमत/विजय शिंदे

अकोट, दि. 8 - अकोट शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा, त्यांच्या मालाची लवकर मोजणी होऊन त्यांना मोबदला त्वरित मिळावा, या उदात्त हेतूने अकोट बाजार समितीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. शेतमालाच्या विक्रीसाठी आॅनलाइन संगणीकृत लिलाव प्रणाली वापरण्यात येते. बाजार समितीसह येथील शेतकरी आणि व्यापारी हे तांत्रिकदृष्टया अपडेटेट आणि स्मार्ट झाले आहे.

 

कधी काळी त्यांनी बाजार समितीमध्ये आणलेला शेतमाल कधी विकला जाईल म्हणजे त्यासाठी किती वेळ लागणार तसेच खरेदीकरिता तुटपुंजे मनुष्यबळ तसेच अशा विविध प्रश्नांमुळे ते हताश व्हायचे; परंतु आता चित्र पालटले. या मागे अमलात आणलेली ई-लिलाव प्रणाली आहे. मार्केट यार्डमध्ये विक्रीच्या विविध स्थळांवर लिलावाची रितसर माहिती पाहण्याकरिता मोठमोठ्या स्क्रिन लावण्यात आल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारावरच शेतमालाचे संगणकीकृत नोंदणी केल्यावर शेतकऱ्यांच्या मोबाइलवर तत्काळ माहितीसुद्धा पुरविली जाते. बाजार समितीतील कुठल्याही स्क्रिनवर कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा भाव बघण्याची शिस्तबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे.

 

त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांची उडणारी धांदल तसेच श्रमसुद्धा वाचलेले आहे. ही प्रक्रिया आटोपून झाल्यावर शेतमालाच्या विक्रीचे मूल्य त्याला मिळालेले भाव हे दर्शविणारे एसएमएस त्या शेतकऱ्यांचा मोबाइलवर तत्काळ पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहेत. ही प्रक्रिया थेट अचूक आणि वेळ वाचवणारी आहे. या करिता या संगणकीकृत ई-लिलाव प्रणालीही अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे, पारदर्शकता दर्शविणारी खरेदी-विक्री पद्धत आणि प्रक्रियेनंतर लगेच हाती पडणारा धनादेश ही नक्कीच वेळ वाचविणारी, आनंद देणारी आणी कौतुकास पात्र म्हणून संपूर्ण सशक्त प्रणाली आहे. यामुळेच हा ई-लिलाव प्रणाली ही नक्कीच शेतकऱ्यांच्या आयुष्यात तसेच शेतकऱ्यांच्या अर्थशास्त्रात एक आमूलाग्र बदल घडवणारी ठरणार आहे.

 

अकोट कृउबा समिती ही राज्यातील सर्वात जुन्या आणि नामंवत अशा कृउबासपैकी एक आहेच. कृउबा समितीने जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत संगणीकृत ई-लिलाव प्रणालीच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. याकरिता प्रयोगिक तत्त्वांवर निवड करण्यात आलेल्या राज्यातील पाच समित्यांमध्ये अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. सर्व व्यवहार संगणकीकृत या लिलाव पद्धतीमध्ये बाजार समितीमधील येणाऱ्या शेतमालाच्या लिलावाची व्यवस्था संगणकीकृत करण्यात आली आहे. लिलावामध्ये (किती) कोणत्या व्यापाऱ्याला माल विकला, शेतमालाचे किती वजन (प्राप्त) झाले, यासोबतच मिळणाऱ्या बिलाची संगणकीय प्रतही तत्काळ सोबतच मिळत आहे. याशिवाय या सर्व व्यवहाराची माहिती संबंधित शेतकऱ्याला एसएमएसद्वारे लगेच दिली जातेय. म्हणजेच बाजार आवारामध्ये होणाऱ्या सर्व व्यवहाराची माहिती शेतकऱ्यांना थेट त्यांच्या मोबाइलवर मिळत असल्याने त्यांना त्याची वेगळी नोंद करण्याची गरज पडत नाही. शेतकऱ्यांसाठी मोबाइल अ‍ॅप ‘ई -लिलावा’ची ही सर्व प्रक्रिया सोपी वाटावी म्हणून शेतकऱ्यांकरिता मोबाइल अ‍ॅपसुद्धा तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अ‍ॅप कसे हाताळावे, याचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची नियमित व्यवस्था बाजार समितीने आपल्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत केली आहे.

 

नागपूर येथील व्हर्चुवल गॅलक्सी ईफोटेक या नामवंत संस्थेने ई-लिलाव प्रणालीचे संपूर्ण अद्ययावत सॉफ्टवेअर शेतकऱ्यांसाठी तयार केले. याद्वारे विविध महत्त्वाची कामे शेतकरी, व्यापारी, अडते व बाजार समिती पार पाडू शकते. जसे -बाजार भाव पाहणे, ई-लिलाव पाहणे, जवळच्या इतर बाजार समितीचे मापाईचे दर पाहणे, बिलाचा हिशेब करणे आदी काम पाहते. ई-लिलाव प्रणालीसाठी तसेच प्रायोगिक तत्तावर सोयाबीन आणि हरभरा या पिकांची निवड करण्यात आली. या कायार्साठी कार्यालयातीलच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांना या प्रक्रियेचे प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यात आले. या संगणकीकृत लिलाव प्रणालीसाठी सर्वात महत्त्वाचे असते ते इंटरनेटचे सशक्त आणि सक्षम नेटवर्क व्यवस्थापन. याकरिता आवश्यकतेनुसार आणि गरजेप्रमाणे एअरटेल कंपनीची 4 एमबीपीएसआणि बीएसएनएल कंपनीची 2 एमबीपीएस क्षमतेच्या अशा दोन लीज लाइनसुद्धा घेण्यात आल्यात. त्यामुळे वेळेवर नेटवर्क उपलब्धतेचा प्रश्न सुटला.

 

धान्य गुणवत्ता तपासणीसाठी अत्याधुनिक मॉईशचर मीटरची खरेदी करण्यात आली आहे. तसेच धान्याच्या गुणवत्ता तपासणी व प्रमाणीकरण करण्यासाठी बाजार समितीमध्ये प्रयोगशाळा उभारणीचे कामसुद्धा आता परिपूर्ण निर्णायक अवस्थेत आहे. मालाची गुणवत्ता हे शेतकऱ्यांना मिळणारे दर निश्चित करते. यामुळे निश्चितपणे शेतमालाची लिलावाची प्रक्रिया अधिक सक्षम, ठोस आणि परिणामकारक होऊन मालाचा गुणवत्तांक स्पर्धाच्या वातावरण निर्मिती जास्त प्रोत्साहित आहे.

 

बाजार समितीमधील ‘ई-लिलाव’ पद्धतीतील महत्त्वाचे टप्पे :

 

१.प्राथमिक स्तरावर तसेच प्रयोगिक तत्त्वांवर सोयाबीन व हरभरा पिकांची निवड.

 

२. कार्यालयातील कर्मचारी तसेच व्यापारी व अडते यांनी संगणकीय प्रणालीचा वापर कसा करावा तसेच त्यासंबंधित इतर गोष्टींचे तांत्रिक शिक्षण देण्यासाठीसुद्धा प्रशिक्षण देण्यात आले.

 

३. ई-लिलाव प्रणाली सक्षम व सक्षक्त करण्यासाठी इंटरनेटच्या दोन लीजलाइन घेण्यात आल्या.

 

४. बिलिंगसाठी ५० टन क्षमतेचे दोन वे-ब्रीज हे संगणक प्रणालीशी जोडण्यात आले आहे.

 

५. मोठ्या तसेच लहान क्षमतेच्या वजनाचे बिलिंग प्रक्रिया कमी वेळेत होण्यासाठी तसेच परिणामकारक व उपयुक्त बनविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली.

 

६. शेतमालाचे गुणवत्ता प्रमाणीकरण करण्याकरिता गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा तयार करण्यात आली.

 

एकूणच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने ई-लिलाव पद्धतीसाठी मिळलेल्या संधीच जणू सोनेच केले आहे. या संधीचे सोने करण्यासाठी बाजार समितीचे सचिव, राजकुमार माळवे, तसेच त्यांची सशक्त टीम म्हणजे कर्तबगार कर्मचाऱ्यांनी हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव सध्याचे बाजार समितीचे सभापती रमेश बोंद्रे, अडत असोसिएशनचे अध्यक्ष सुनील गावंडे तसेच प्राधिनिधिक स्वरूपात प्रफुल पंजाबराव पिंपळे यांच्यासारखे जागृत शेतकरी यांच्या सहकार्यामुळेच आज हे दृश्य आपल्याला बघायला मिळते. ई-लिलाव प्रणालीमध्ये आवश्यकतेनुसार अद्ययावत करण्याची सोय आहे. त्यानुसार चारही टप्पे यशस्विपणे पार पाडले आहे.

 

चारही टप्पे यशस्वीपणे पूर्ण करणारी अकोट बाजार समिती ही राज्यातील पहिलीच बाजार समिती ठरली आहे. ई-लिलाव प्रणालीविषयी अनेकांना शंका होती; परंतु आता बाजार समितीमधील व्यापारी वर्गसुद्धा आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे या ई-लिलाव प्रणालीचा वापर करीत आहेत.

 

 ‘ई-लिलाव’ पद्धतीचे महत्त्वाचे फायदे :

 

१.शेतमाल विक्रीची प्रक्रिया गतिमान व सुकर झाली.

 

२.शेतकऱ्यांना मिळणारा रास्त दर.

 

३.बाजार समितीच्या व्यवहारात पार्दशकता आली.

 

४.शेतकरी, अडते आणि बाजार समितीच्या वेळेची बचत.

 

५.कामात अचुकता, शेतमालाचे अचूक मोजमाप.

 

६.संगणकीय बिल आणि धनादेशाद्वारे दिले जात असलेला मोबदला यामुळे बाजार समितीची कॅशलेस होण्याकडे वाटचाल.

 

ई-लिलाव ही संकल्पना भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनात एका मोठ्या बदलांची नांदी ठरू शकणारी संकल्पना म्हणता येईल, याकरिता निश्चितच राज्य सरकार, सहकार विभाग आणि बाजार समितीनी या नवीन तंत्रज्ञानाचे स्वागत करून त्याच्या हाकेला प्रतिसाद दिला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव सध्याचे बाजार समितीचे सभापती रमेश बोंद्रे, अडत असोसिऐशनचे अध्यक्ष सुनील गावंडे तसेच प्राधिनिधिक स्वरूपात प्रफुल पंजाबराव पिंपळे यांच्यासारखे जागृत शेतकरी यांच्यामुळेच आज ई-लिलाव प्रणाली समक्षपणे यशस्वी वाटचालीवर आहे. त्यामुळेच अकोट, कृषी उत्पन्न बाजार समितीचा विधायक आणि कृतिशील प्रयत्न हे बाजार समिती आणि शेतकरी बंधूंमधील नात्याला अधिक बळकटी देणारे ठरोत. 

Web Title: Eco-auction takes place in Akot's market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.