मुस्लिमांनी उभारलेल्या ‘इको-फ्रेण्डली’ ताबुताचे हिंदू होणार खांदेकरी अन् घडणार जातीय सलोख्याचे दर्शन
By Azhar.sheikh | Published: September 28, 2017 11:16 PM2017-09-28T23:16:40+5:302017-09-28T23:21:57+5:30
नाशिक शहरातील जुने नाशिक या गावठाण भागातील सारडा सर्कल येथे शेकडो वर्षे जुनी हजरत सय्यद इमामशहा बाबा यांची दर्गा आहे. या दर्ग्याच्या प्रांगणात मुहर्रमच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये एक आगळा उत्सव दरवर्षी बघावयास मिळतो. हिंंदू-मुस्लीम भाविक ‘मुहर्रम’ या उर्दू महिन्याच्या आठ, नऊ व दहा तारखेला या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ हजेरी लावून ताबुतापुढे प्रार्थना करतात.
आॅनलाइन लोकमत, नाशिक -धार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा ही जुळलेली असतेच अन् अशा परंपराच त्यांचे वैशिष्ट्य ठरतात, पारंपरिक प्रथांमधून आजही भारताची एकात्मता अधिकाधिक बळकट होताना दिसून येते. नाशिकच्या ‘इमामशाही’ दर्गा परिसरात दरवर्षी होणारा मुहर्रमचा उत्सव अन् त्याची परंपरा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानली जाते. येथे अळीवच्या बियांपासून मुस्लीम कुटुंबीय हिरवळीचा ताबूत तयार करतात अन् आशुरा’च्या दिनी अर्थात मुहर्रमला हिंदू कोळी बांधव या ताबुताचे खांदेकरी होतात, यावेळी जातीधर्माच्या सर्व भिंती भेदल्या जातात अन् जातीय सलोख्याचे दर्शन घडते.
नाशिक शहरातील जुने नाशिक या गावठाण भागातील सारडा सर्कल येथे शेकडो वर्षे जुनी हजरत सय्यद इमामशहा बाबा यांची दर्गा आहे. या दर्ग्याच्या प्रांगणात मुहर्रमच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये एक आगळा उत्सव दरवर्षी बघावयास मिळतो. हिंंदू-मुस्लीम भाविक ‘मुहर्रम’ या उर्दू महिन्याच्या आठ, नऊ व दहा तारखेला या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ हजेरी लावून ताबुतापुढे प्रार्थना करतात. या तीन दिवसांमध्ये येथे यात्रोत्सव भरविला जातो.
या यात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते ते म्हणजे अळीवच्या बियांपासून तयार झालेला व हिरवळीने नटलेला आकर्षक ताबूत. हा ताबूत वर्षानुवर्षांपासून येथील सय्यद कुटुंबीय तयार करत आले आहे अन् या ताबुताचे मानकरी म्हणून खांदेकरीच्या भूमिकेत हिंदू कोळी बांधव राहिले आहेत. या शेकडो वर्षे जुन्या पारंपरिक प्रथेतून आजही हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. यावर्षी येत्या शनिवार व रविवार इमामशाही दर्गाच्या परिसरात यात्रा भरणार आहे. रविवारी (दि.१) मुहर्रमचा दहावा दिवस असून, ‘आशुरा’चा दिन म्हणून मुस्लीम बांधव पाळणार आहे. या दिवशी शहीद-ए-आझम हजरत सय्यद इमाम हुसेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुस्लीम समाजबांधव सामूहिकरीत्या शरबत, दूध कोल्ड्रिंक्सचे प्रसाद म्हणून वाटप करतात. या दिवशी इमामशाही दर्गाच्या आवारात हिंदू बांधव हिरवळीच्या ताबुताचे खांदेकरी होऊन संध्याकाळी पाच वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत अनवाणी पायाने उभे राहतात. हा ताबूत जुन्या नाशकातून निघणाºया मिरवणुकीत सहभागी होत नाही. ताबूत संपूर्ण पाच ते सहा तास पाच ते सहा हिंदू बांधव खांद्यावर घेऊन उभे असतात. यावेळी भाविक मनोभावे दर्शन घेताना दिसून येतात.
दहा दिवस अथक परिश्रम
बांबूच्या कामट्यांपासून सुरू होणारे ताबूतनिर्मितीचे काम दहा दिवस चालते. या दहा दिवसांमध्ये मुस्लीम सय्यद कुटुंबीय अथक परिश्रम घेतात. बांबूपासून ताबुताचा साचा तयार झाल्यानंतर त्या कामट्यांभोवती कापसाचा वापर केला जातो. या कापसामध्ये अळीवच्या बियांचे रोपण केले जाते. या बियांना सकाळ-संध्याकाळ पाण्याचा स्प्रे मारला जातो. पाच ते सहा दिवसांनंतर बियांना अंकूर फुटतो आणि मुहर्रमच्या दहा तारखेला यात्रोत्सवापर्यंत हिरवळीने नटलेला ताबूत भाविकांना आकर्षित करणारा ठरतो. यासाठी मात्र दहा दिवस कुटुंबीयातील सदस्य राबतात.