मीरा-भाईंदरमध्ये ईको फ्रेंडली बाप्पाची प्रतिष्ठापना, देखाव्यात सामाजिक संदेशावर भर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 08:19 PM2017-08-31T20:19:43+5:302017-08-31T20:20:51+5:30
भाईंदर पूर्वेच्या नर्मदा नगरमधील श्रद्धा-सबुरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा युरोपमधील साडेसहाशे वर्षापूर्वी एका झाडातील स्वयंभू गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ही मूर्ती एका वृक्षातून प्रगट झाल्याची माहिती असून त्याची प्रतिकृती मातीद्वारे साकारण्यात आली आहे.
राजू काळे/ भार्इंदर, दि. 31 - भाईंदर पूर्वेच्या नर्मदा नगरमधील श्रद्धा-सबुरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा युरोपमधील साडेसहाशे वर्षापूर्वी एका झाडातील स्वयंभू गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ही मूर्ती एका वृक्षातून प्रगट झाल्याची माहिती असून त्याची प्रतिकृती मातीद्वारे साकारण्यात आली आहे. देखाव्यात चलचित्राद्वारे शहरातील समस्यांची तीव्रता दर्शविण्यात आली असून त्या सुधारण्यासाठी सामान्य नागरिक प्रशासन व राजकारण्यांकडे मागणी करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे.
मंडळाचे यंदा ७ वे वर्ष असून प्रत्येक वर्षी मातीच्याच मूर्तीची प्रतिष्ठापना मंडळाने केली असली तरी जगातील वेगवेगळ्या देशातील गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना, हे मंडळाचे आकर्षण ठरत असल्याचे अध्यक्ष प्रदीप जंगम यांनी सांगितले. तसेच केबीन रोडवरील जय अंबे नगर गणेश मित्र मंडळाने यंदा मातीच्याच मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून गतवर्षी या मंडळाने जेम्स या सुमारे २५ हजार चॉकलेटच्या गोळ्यांनी तयार केलेली मूर्ती साकारली होती. मंडळाने यंदा देशाच्या सीमारेषेचे रक्षण करणा-या सैनिकांच्या जीवनावर आधारीत देखावा चलचित्राद्वारे दाखविला आहे.
मीरारोड येथील म्हाडा गृहसंकुल क्लस्टर तीनमधील स्वस्तिक संकुल सार्वजनिक गणेश मंडळाने यंदाही कागदापासून बनविलेली सुमारे ५ फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. देखाव्यासाठी प्रदुषणाचा विषय निवडण्यात आला असून प्लास्टिक मुक्त संकल्पना राबविण्यात आली आहे. प्लास्टिकऐवजी कापड व कागदाच्या वस्तू वापरण्याची जनजागृती गणेशभक्तांत केली जात असल्याचे मंडळाचे पदाधिकारी अविनाश देगासकर यांनी सांगितले.
भार्इंदर पश्चिमेकडील सिद्धी विनायक यंग स्टार गणेश मंडळ, विनायकनगर गणेश मंडळ, मोदी पटेल मार्ग गणेश मंडळ आदी मंडळांनी देखील शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. यातील विनायक नगर गणेश मंडळाचे यंदा ४१ वे वर्ष असून प्रत्येक वर्षी मंडळाने इको फ्रेन्डली गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केल्याचे पदाधिकारी केहुल शाह यांनी सांगितले. अशा प्रकारच्या इको फ्रेन्डली मूर्ती आणखी काही सार्वजनिक गणेश मंडळांकडून प्रतिष्ठापित केल्या असून काही घरगुती गणेशमूर्तीही शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आल्याचे दिसून आले.
यंदाच्या गणेशोत्सवात सुमारे 25 हून अधिक गणेश मंडळांनी इको फ्रेन्डली गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केल्याचे मूर्तीकारांकडून सांगण्यात येत आहे. शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविणारे काही मोजकेच मूर्तीकार शहरात असून ते सुद्धा ऑर्डरखेरीज मातीच्या मूर्ती बनवत नसल्याचे शाडूच्या मूर्ती घडविणारे गौतम बापट यांच्याकडून सांगण्यात आले. केवळ दोन फुटापर्यंतच्याच मूर्ती घरगुती गणेशोत्सवासाठी तयार करण्यात येत असून मोठ्या मूर्तींसाठी मात्र गणेशभक्तांना शहराबाहेरील मूर्तीकारांकडे ऑर्डर द्यावी लागत असल्याचे बापट यांनी सांगितले.
याचप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवात अनेक गणेश मंडळांनी सामाजिक संदेशांवर भर देत भक्तांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. याखेरीज शहरात प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी)च्या मूर्तींपासून जलप्रदुषण होत असतानाच गणेशमूर्तींना रत्नखड्यांची आभुषणांनी मढवल्याचे दिसून आले. विसर्जनानंतर पीओपी मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने जलप्रदुषण होत असताना त्यावरील रत्नखडेही पाण्यातील जलचरांच्या जीवावर बेतते. त्यामुळे अशा मूर्तींची प्रतिष्ठापना न करता शाडूची माती, कागद, हिरवळ, गवत, खाद्यपदार्थ वा अन्नधान्यांपासून तयार करण्यात आलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन पर्यावरणप्रेमी अॅड. किशोर सामंत यांनी गणेशभक्तांना केले आहे.