पर्यावरणपूरक सजगतेचे दर्शन

By admin | Published: September 10, 2016 01:49 AM2016-09-10T01:49:55+5:302016-09-10T01:49:55+5:30

ढोलताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत भक्तांनी साश्रुनयनांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

Eco-friendly view | पर्यावरणपूरक सजगतेचे दर्शन

पर्यावरणपूरक सजगतेचे दर्शन

Next


मुंबई : ढोलताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत भक्तांनी साश्रुनयनांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. पर्यावरणपूरक सजगतेचे दर्शन घडवत कृत्रिम तलावांमध्येही विसर्जन करण्यात आले.
गणपती विसर्जनासाठी विविध चौपाट्यांवर सुरक्षिततेकरिता खास उपाययोजना करण्यात आल्या होत्या. दादर, कुलाबा, गिरगाव चौपाट्यांवर जेली फिश, स्टिंग-रे माशांचा पुन्हा वावर दिसून आल्याने शुक्रवारी विशेष दक्षता घेण्यात आली होती. बाप्पाच्या निरोपासाठी मुंबईचे किनारे सज्ज झाले असून, प्रशासनानेही यासंदर्भात जय्यत तयारी केली आहे. तसेच समुद्रातल्या माशांपासून त्रास होऊ नये, यासाठी गणेशभक्तांना खबरदारी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून हजेरी लावणाऱ्या पावसाने मुंबईमध्ये आज काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसून आले. विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडावी यासाठी पोलीसही सज्ज होते. विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे पथक व स्वयंसेवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेली काही वर्षे पर्यावरण संस्था आणि काही एनजीओंच्या माध्यमातून इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
>गौरी-गणपतींचे आज विसर्जन
मुंबई शहर-उपनगरांत गौरी-गणपतींचे शनिवारी विसर्जन केले जाणार आहे. बाप्पांसोबतच माहेरवाशीण गौरीलाही शनिवारी निरोप दिला जाणार आहे. मागील सहा दिवस सकाळ-संध्याकाळ बाप्पांची होणारी पूजाअर्चा, नैवेद्याची तयारी, घराघरांतून उमटणारा टाळ आणि झांजांचा आवाज आज एकदम कमी होईल. त्यासाठी कृत्रिम तलाव, समुद्रकिनाऱ्यांजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या वेळी निर्माल्य पाण्यात न टाकता ते निर्माल्यकलशात गोळा करण्याचे आवाहन पर्यावरण संस्था व पालिकेने केले आहे. पाच दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुख्य रस्त्यांच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. आवश्यक सूचना व माहिती दर्शनी भागात फलकांवर लावण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी व महापालिकेने केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन यंत्रणांनी केले आहे.

Web Title: Eco-friendly view

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.