इकोफ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 04:51 AM2018-12-09T04:51:39+5:302018-12-09T04:52:07+5:30
इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
- जयंत धुळप
अलिबाग : हराळी, उस्मानाबाद येथे आयोजित २६व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक परिषदेत रायगड जिल्ह्यातील लोधिवली येथील रिलायन्स फाउंडेशन स्कूलमधील मराठी माध्यमाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ‘इकोफ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन’ या वैज्ञानिक प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. पंजाबमध्ये होणाऱ्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये रिलायन्स फाउंडेशन स्कूलच्या विद्यार्थिनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
हिमानी जोशी, पूर्वा बेलगल्ली आणि केतकी लबडे यांनी हा प्रकल्प शाळेतील विज्ञान विषयाच्या प्रयोगशील शिक्षका वैष्णवी मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करून सादर केला होता. सॅनिटरी नॅपकिनचे व्यवस्थापन व ते इकोफ्रेंडली करण्याबाबत आवश्यक शास्त्रीय पर्याय उपलब्ध नव्हता आणि म्हणूनच हाच वेगळ्या वाटेचा विषय विज्ञान शिक्षिका वैष्णवी मोडक यांनी विद्यार्थिनींना यावेळी मार्गदर्शन केले. सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचºयाच्या भीषणतेची जाणीव समाजाला करून देण्यासाठी, घनकचरा व्यवस्थापन व इकोफ्रेंडली पर्याय हा विषय प्रकल्पासाठी निवडला. यामध्ये त्यांंनी सर्वेक्षण, प्रयोग आणि मुलाखतीचा अवलंब केला.
सर्वेक्षण परिसरातील ८१ टक्के स्त्रिया या नॅपकिन वापरतात. सरासरी एक स्त्री दिवसाला ४ नॅपकिन वापरते आणि मासिक पाळी असण्याचे सरासरी दिवस हे चार असतात. म्हणजे एक स्त्री १६ नॅपकिन एका मासिक पाळीसाठी वापरते. या प्रमाणात सॅनिटरी नॅपकिन्सचा घनकचरा मोठ्या प्रमाणात तयार होतो. त्यास त्यांनी इकोफ्रेंडली पर्याय म्हणून बांबू टॉवेलपासून बांबू नॅपकिन बनविले. बांबू हा कॉटनपेक्षा जास्त अॅब्सॉरबंट आहे, शिवाय हा आपल्याला सहज उपलब्ध होतो. त्याचबरोबर, या विद्यार्थिनींनी शाळा परिसरातील बचत गटांमध्ये जाऊन मेन्स्ट्रुल कप व डिस्ट्रॉइंग मशिनबद्दल जागृती केली.
३० प्रकल्पांत उत्कृष्ट
३० नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद येथे झालेल्या २६व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक राज्य परिषदेत आलेल्या एकूण ७४ वैज्ञानिक प्रकल्पांमध्ये अत्यंत खडतर अशा परीक्षणाच्या दोन फेºया यशस्वीरीत्या पार करून, राष्ट्रीय स्तराकरिता निवडलेल्या अंतिम ३० वैज्ञानिक प्रकल्पांत या प्रकल्पाने स्थान प्राप्त केले. हिमानी जोशी हिने परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना अचूक उत्तरे देऊन या अंतिम ३० प्रकल्पांत सर्वोत्कृष्ट प्रकल्प म्हणून स्थान प्राप्त केले. परिणामी, आता पंजाबमध्ये होणाºया इंडियन सायन्स काँग्रेस या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या प्रकल्पाची निवड झाली आहे.