आर्थिक राजधानी ‘अर्थ’हीन : गर्दी, गोंधळ आणि शुकशुकाट...
By admin | Published: November 10, 2016 04:09 AM2016-11-10T04:09:50+5:302016-11-10T04:09:50+5:30
क्रॉफर्ड मार्केट, दादर ही मुंबईतील खरेदीची टॉप ठिकाणे. ३६५ दिवस येथील बाजारपेठांमध्ये खरेदीला उधाण आलेले असते. पण बुधवारी मात्र या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता.
टीम लोकमत, मुंबई
क्रॉफर्ड मार्केट, दादर ही मुंबईतील खरेदीची टॉप ठिकाणे. ३६५ दिवस येथील बाजारपेठांमध्ये खरेदीला उधाण आलेले असते. पण बुधवारी मात्र या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. खरेदीला आलेल्या कित्येकांना ५०० आणि १ हजारांच्या नोटांचे सुट्टे नसल्यामुळे परतावे लागले. हीच परिस्थिती मॉलमध्येही पाहायला मिळाली. खरेदीपासून फुडस्टॉल सारेच थंडावले असल्यामुळे मुंबई आणि उपनगरातील अनेक विक्रेत्यांना फटका बसला.
मुंबई म्हणजे ‘शॉपिंग हब’. येथे दिवसाला हजारो कोटींची उलाढाल होते. दररोज कित्येक लोक वेगवेगळ््या राज्यातून येथील बाजारपेठांमध्ये खरेदी करायला येतात. पण हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे खास खरेदीसाठी आलेल्या अनेक पर्यटकांना बुधवारी रिकाम्या हाताने परतावे लागले. खिशात पैसे असूनही हॉटेल आणि खरेदीचा आस्वाद नागरिकांना घेता आला नाही. मंगळवारी रात्री नोटा रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर अनेक मॉल्सनी लोकांना आशा दाखवत दुकाने मध्यरात्रीपर्यंत सुरु ठेवली. त्यामुळे स्थानिकांनी मॉल मध्ये खरेदीचा आनंद लुटत स्वत: जवळ असलेल्या पाचशे-हजार रुपयांच्या नोटांचा निकाल लावला. मॉलमध्ये नोटा घेतील या आशेने अनेक जणांनी खरेदीसाठी गर्दी केली पण नोटा स्विकारवल्यामुळे मॉलमध्येही शुकशुकाट पसरला.
सुट्या पैशांऐवजी स्कीम्सची धूम
हजार आणि पाचशेचे सुट्टे नसल्यामुळे अनेक दुकानदारांचे व्यवहार ठप्प झाले होते. ग्राहकांना साहित्य घ्यायचे असूनही केवळ सुट्या पैशांच्या अभावामुळे सामान खरेदी करता येत नव्हते. यावर शक्कल लढवत अनेक फेरीवाल्यांनी स्किम सुरु केल्या. शर्ट सोबत पँट ५०० रुपये अशी साद घालत अनेक फेरीवाले ग्राहकांना आकर्षित करत होते.
अनेक फेरीवाल्यांच्या युनियनने एकदिवसाचे नुकसान वाचविण्यासाठी कपड्यांचे पॅकेज बनवून त्यांचा दर ५०० रुपये ठेवला होता. नुकसान टाळण्यासाठी पाचशे रुपये स्विकारण्याचा निर्णय अनेक विक्रेत्यांनी घेतल्यामुळे अनेकांनी चक्क रस्त्यांवरील गाळ््यांवर खरेदी करण्यास प्राधान्य दिले.
भाज्यांची खरेदी घटली
भाजी खरेदीवरही याचा परिणाम झाला. भाज्यांसाठी सुट्टे असेपर्यंत भाजी विक्रेत्यांनी भाजी विकली पण सुट्टे पैसे संपल्यानंतर मात्र भाजी विक्री पूर्ण ठप्प झाली, असे दादर भाजी मार्केट मधील राजू पांडे या विक्रेत्याने सांगितले. त्यामुळे दुपारनंतर केवळ सुट्टे पैसे नसल्यामुळे भाज्या पडून होत्या. त्यामुळे अनेकांनी दुकांनाना कुलुप लावून घरी जाणे सोयीस्कर मानले.
‘ओला’ सुसाट
मुंबई आणि उपनगरातील बाजारपेठा, हॉटेल सारे थंडावले असताना ‘ओला’ मात्र सुस्साट होती. सारेच हजार, पाचशेच्या नोटा नाकारत असल्याचे पाहत अनेकांनी मोबाईलमधून ओला मनीचे रिचार्ज केले. या रिचार्जमधून हॉटेल, मोबाईल रिचार्ज, शॉपिंग, प्रवास, थिएटर तिकीट खरेदी करणे सोयीस्कर ठरत होते. त्यामुळे बुधवारचा दिवस ‘ओला’ साठी महत्त्वपूर्ण ठरला.
पाचशेची नोट घेणार का?
बाजारांमध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या अनेकांना लहान-लहान वस्तूंची खरेदी करताना पाचशेची नोट घेणार का ? असे विचारुनच खरेदी करायला लागत होते. त्यामुळे दिवसभरात लोक सगळ््यांनाच हा प्रश्न विचारुन मगच खरेदी करत होते.
चित्रपटगृहांमध्ये शुकशुकाट
चित्रपटगृह प्रशासनाने ५०० रुपयांच्या नोटा स्विकारु नका, असे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. त्यामुळे दुपारनंतर अनेक चित्रपटगृहांंमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.
पेट्रोलपंप, रुग्णालयांबाहेर रांगाच रांगा
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबईही पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांअभावी बुधवारी अर्थहीन दिसली. चलनातून बाद केलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांमुळे मुंबईत वेगवेगळ््या ठिकाणी गर्दी, गोंधळ आणि शुकशुकाट दिसून आला.
मुंबई नगरी कधीही थांबत नाही, असे म्हटले जाते. मात्र पाचशे आणि हजारांच्या नोटांअभावी येथील बहुतेक वर्दळीच्या रस्त्यांवर आज शुकशुकाट होता. याउलट एकमेकांशी बोलण्यास वेळ नसलेल्या पेट्रोलपंप, रेल्वे स्थानक आणि वीजभरणा केंद्रांवर गर्दी आणि गोंधळ दिसून आला. या सर्व ठिकाणांहून अधिक बिकट परिस्थिती दिसली, ती रूग्णालयांमध्ये. दुपारपर्यंत सर्व नोटा स्विकारून सुटे पैसे देणाऱ्या रूग्णालयांशेजारी मेडिकलमध्ये सुटे पैशांअभावी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्विकारण्यास मनाई करण्यात आली. परिणामी केईएम, जेजे, नायर
आणि प्रमुख शासकीय रूग्णालयांबाहेर रूग्णांचे नातेवाईक आणि
केमिस्टमध्ये वादावादीचे प्रसंग दिसले.
कापड बाजार ठप्प !
मुंबई : लग्नसराईत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने मुंबईतील कापड बाजार बुधवारी ठप्प झाला. महागड्या साड्या, ड्रेस मटेरियल आणि शर्ट व पँट पीस खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हातानेच माघारी परतावे लागल्याचे कपडा व्यापाऱ्यांनी सांगितले.
दक्षिण मुंबईतील मुळजी जेठा मार्केट, मंगलदास मार्केट, स्वदेशी मार्केट, काकड मार्केट, आर जे मार्केट या पाच प्रमुख कपडा बाजारांत लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी रोजच गर्दी असते. येथे येणारे बहुतांश ग्राहक हे रोखीने व्यवहार करतात. त्यात कपड्याचे बिल हे हजारांत असल्याने प्रत्येक ग्राहकाकडून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा देण्यात येतात. मात्र याच नोटांवर शासनाने बंदी आणल्याने व्यापार बंद ठेवण्याशिवाय व्यापारांसमोर दुसरा पर्याय नव्हता. एकंदरीत परिस्थिती पाहता आणखी दोन दिवस तरी बाजार थंड राहील.
ऐन लग्नसराईत एक दिवस सर्व बाजार बंद राहिल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प राहणार आहे, अशी प्रतिक्रिया कपडा विक्रेत्यांचे पदाधिकारी एस.पी. अहुजा यांनी दिली. अहुजा म्हणाले की, गुरूवारी १० तारीख असून कामगारांच्या पगारांचा दिवस आहे. मात्र कामगारांच्या पगारांसह रोजंदारी कामगारांना मजुरी द्यायची तरी कशी? हा मूलभूत प्रश्न भेडसावत असल्याचे अहुजा यांनी सांगितले.
खिशात पैसे आहेत, पण...
मुंबई : खिशात पैसे असूनही औषधे घेता येत नसल्यामुळे अगतिक झालेले रुग्णांचे नातेवाईक मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात बुधवारी दिसून आले. मुंबईतील प्रमुख महापालिका आणि सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी येणारे बहुतांश रुग्ण हे मुंबईबाहेरचे असतात. काल रात्रीच चलनातून ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्याने त्यांची औषध, खाण्यासाठी वणवण सुरू होती.
राज्यातील सर्व ठिकाणांहून उपचार घेण्यासाठी अनेक जण मुंबईत येतात. त्यामुळे मुंबईत येताना ते उपचारांसाठी लागणारे हजारो रुपये घेऊन येतात. त्यामुळे अनेकांकडे ५०० आणि १००० च्या नोटाच आहेत. इतक्या लांब येताना १०० किंवा ५० च्या नोटा आणल्या तर चोरी होण्याची भीती अधिक असते. १००० आणि ५०० च्या नोटा असल्यावर त्या जवळ बाळगता येतात. रुग्णालयात काहीच प्रश्न नाही. पण बाहेर पडल्यावर काय, हा प्रश्न पडल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांचे म्हणणे होते.
नोटांचा ओघ वाढला देवस्थानांच्या दानपेटीकडे!
मुंबई : पाचशे, हजाराच्या चलनातून रद्द झालेल्या नोटांचा देवस्थानांच्या दानपेटीत ओघ मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. मुंबईतील सिद्धिविनायक, महालक्ष्मी आणि मुंबादेवी या प्रमुख देवस्थानांच्या दानपेटीत भक्तांकडून नोटांचा अक्षरक्ष: पाऊस पडू लागला आहे.
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे कार्यकारी संचालक संजीव पाटील यांनी यासंदर्भात सांगितले की, ५०० आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा व्यवहारातून बंद झाल्या असल्या तरी या नोटा सिद्धिविनायकाच्या चरणी देणगी म्हणून स्वीकारल्या जात आहेत. मंदिराच्या दानपेटीत ५०० आणि १ हजाराच्या नोटा जमा होत असून, मंदिर व्यवस्थापन नंतर त्या बँकेतून बदलून घेणार आहे. पूजेसाठी आॅनलाइन बुकिंग केलेल्या तसेच ज्या भक्तांकडून पावतीची मागणी केली जाईल, त्यांच्यासाठीही आम्ही व्यवस्था करत आहोत. त्यामुळे ५०० आणि १ हजाराच्या नोटांच्या व्यवहाराचा हिशोब व्यवस्थापनाकडून तंतोतंत ठेवला जात आहे. नोटा बदलून घेण्यासाठी केंद्र सरकारने ३० डिसेंबर मुदत दिल्याने व्यवहारात नसलेल्या परंतु मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या या नोटा बदलून घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे हिशेब मात्र चोख असणार आहे. महालक्ष्मी मंदिरातर्फे राजेश माजगुणकर यांनी सांगितले की, महालक्ष्मी मंदिरात ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटांच्या देणगीवर कोणतीही बंधने घालण्यात आलेली नाहीत. या नोटा दान म्हणून स्वीकारण्यात येत आहेत. काही बँकाशी आम्ही संलग्न असल्याने मंदिरात दान म्हणून आलेल्या नोटा संबंधित बँकेतून बदलून घेण्यात येतील.