‘नोटाबंदी’मुळे आर्थिक मंदी आली हा सर्रास विपर्यास : माधव भांडारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 10:53 AM2019-11-08T10:53:13+5:302019-11-08T10:56:09+5:30
नोटाबंदी निर्णयाचे यशापयशासाठी आगामी किमान २0 वर्षांचा कालावधी गृहीत धरावा लागेल..
पुणे : नोटाबंदीमुळे आर्थिक मंदी आली हा सर्रास विपर्यास असून, जागतिक स्तरावर झालेल्या घडामोडी त्यास मुख्यत: कारणीभूत आहेत. नोटाबंदी निर्णयाचे यशापयशासाठी आगामी किमान २0 वर्षांचा कालावधी गृहीत धरावा लागेल, असे मत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ता माधव भांडारी यांनी व्यक्त केले.
प्रा. विनायक आंबेकर लिखित ‘नोटसम्राट-नोटबंदीची सुरसकथा’ या कादंबरीचे प्रकाशन माधव भांडारी यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अग्निपंख प्रकाशन आणि शुभम साहित्यतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले होते.
सामाजिक कार्यकर्ते आणि नोटाबंदीचे अभ्यासक विवेक खरे आणि लेखक प्रा.विनायक आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
माधव भांडारी म्हणाले, की २0१२च्या गुजरात विधानसभा निवडणुका ते 2014 च्या लोकसभा निवडणुका या मधल्या काळात नोटाबंदीच्या निर्णयाची प्रस्तावना झाली. आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी हा कालावधी सोडून दिला. याच दोन वर्षात पडद्यासमोर आणि पडद्यामागे समाजकारण, अर्थकारण आणि राजकारणाला वळण देणाºया अनेक घटना घडल्या. नोटाबंदीसारख्या धाडसी निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाºयांचेच केवळ धाबे दणाणले. नोटाबंदीच्या निर्णयाला तीन वर्षे होऊनही भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पाहणारे काळा पैसाधारक हवालदिल आहेत. नोटाबंदी हा राजकीय मुद्दा करून केवळ एकमेकांवर चिखलफेक, आरोपप्रत्यरोपपुरता मर्यादित
नसून हा अतिशय गंभीर आणि व्यापक विषय असल्याचे त्यांनी सांगितले. नोटाबंदीचे अभ्यासक विवेक खरे आणि अजित अभ्यंकर यांनी मनोगत व्यक्त केले. लेखक प्रा. विनायक आंबेकर यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका विशद केली.