पानमळ्यातून साधली आर्थिक उन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 11:39 AM2018-10-09T11:39:03+5:302018-10-09T11:39:27+5:30

यशकथा : नांदेड जिल्ह्यातील चाभरा (ता. हदगाव) येथील शेतकरी शंकर उमाजी मरकुंदे यांनी नवीन प्रयोग करून पानमळा शेतीचा नवा पॅटर्न निर्माण केला.

Economic progress achieved through leaf farming | पानमळ्यातून साधली आर्थिक उन्नती

पानमळ्यातून साधली आर्थिक उन्नती

googlenewsNext

- युनूस नदाफ (पार्डी, जि. नांदेड)

दुष्काळ अन् वारंवारच्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी पारंपरिक पिकांना फाटा देत नांदेड जिल्ह्यातील चाभरा (ता. हदगाव) येथील शेतकरी शंकर उमाजी मरकुंदे यांनी नवीन प्रयोग करून पानमळा शेतीचा नवा पॅटर्न निर्माण केला. विशेष म्हणजे गारपिटीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना या पिकाने मोठा आर्थिक आधार दिला. सिंचन व्यवस्थेत चाभरा गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, या भागातील शेतकरी केळी, हळद, सोयाबीन, कापसाला पसंती देतात़ मात्र, दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असून, तसेच बाजारात केळी, कापूस, सोयाबीन, हळद पिकाला कवडीमोल भाव मिळतो़ याउलट नागवेलीच्या पानांना बाराही महिने चांगला भाव मिळत असल्याने अनेक तरुण शेतकरी पानमळा शेतीकडे वळत आहेत.

शंकरराव उमाजी मरकुंदे यांच्याकडे २५ एकर जमीन वडिलोपार्जित आहे़ त्यांचे शिक्षण बीए झालेले असून, शेतीमध्ये काही नवीन करण्याची इच्छा असल्याने त्यांनी एक एकरमध्ये नागवेली पानाच्या कपुरी जातीची लागवड केली़ प्रथम त्यांनी शेवरी व शेवगा यांची जून महिन्यात सरी पद्धतीने लागवड केली़ सप्टेंबरमध्ये शेवग्याच्या बुडाशी दोन फुटाच्या अंतराने नागवेलीची लागवड केली. लागवडीपूर्वी शेणखताचा वापर केला. विशेष म्हणजे पाऊस, गारपिटीमुळे नुकसान होऊ नये, यासाठी पानमळ्याच्या चारही बाजूने कुपटाने संरक्षण केले. 

पानमळ्यातून वर्षात एकरी दहा लाखाचे उत्पादन निघते खर्च वजा जाता सात ते आठ लाखांचे त्यातून उत्पन्न मिळत असल्याने शेतक-यांना मोठा आधार झाला.पानाला श्रीरामपूर, परभणी, जळगाव, नाशिक येथील बाजारपेठेत मागणी आहे.एक हजार पानावर २५० ते ५०० रुपयांपर्यंत भाव मिळतो़ नागवेली मळ्याला पाणी कमी लागते़ नागवेलीची लागवडीपासून दहा महिन्याच्या अखेरीस पान तोडण्यास येतात़ तेव्हापासून १२ महिने नागवेलीला पान राहतात.नागवेलीच्या मळ्यात १२ महिने महिला मजुरांना काम असते़ नागवेली मळ्यामुळे मजुरांनाही काम उपलब्ध असतो़ 

पानमळ्यात लावण्यात आलेल्या शेवगा, शेवरी या झाडापासून शेळ्यांसाठी चारा उपलब्ध होत असते़ त्यामुळे शेळीपालन व्यवसायसुद्धा त्यांनी सुरू केला.मरकुंदे यांच्याकडे १० खानदानी शेळ्या असून, त्याच्यापासून जन्मलेली १६ पिल्ले झाली आहेत. त्यांनी शेळीपालनाचाही जोड व्यवसाय सुरू केला. पानमळ्याला पाणी कमी लागते. नागवेलीची लागवड केल्यानंतर काही दिवस पाटाने पाणी दिले जाते. नागवेली दोन ते तीन फुटांची झाल्यानंतर ठिबकद्वारे मळ्याला पाणीपुरवठा केला जातो़ त्यामुळे या पिकाला पाणी कमी लागते कारण की शेवगा व शेवरीचे झाडे १५ ते २० फुटांची उंची असल्याने व मळ्याला चारही बाजूने कुंपण असल्याने मळ्यात उन्हाची तीव्रता कमी होऊन शेतीला पाणी कमी द्यावे लागते़

Web Title: Economic progress achieved through leaf farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.