अर्थव्यवस्थादेखील बिघडायला लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2016 02:28 AM2016-12-26T02:28:15+5:302016-12-26T02:28:15+5:30

गहू, उस, कांदा, बटाट्याचे भाव पार पडले आहेत, असे आताच्या राज्यकर्त्यांना कोणी सांगितले तर त्यांच्याकडून उत्तर येते, की एका दृष्टीने बरे झाले

The economy also got worse | अर्थव्यवस्थादेखील बिघडायला लागली

अर्थव्यवस्थादेखील बिघडायला लागली

Next

मंचर : गहू, उस, कांदा, बटाट्याचे भाव पार पडले आहेत, असे आताच्या राज्यकर्त्यांना कोणी सांगितले तर त्यांच्याकडून उत्तर येते, की एका दृष्टीने बरे झाले, खाणाऱ्याची सोय झाली. देशातील ५२ टक्के लोकसंख्या शेतीच्या क्षेत्रात आहे व या राज्यकर्त्यांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचा दृष्टिकोन नाही. त्यामुळे आज शेतकरी पूर्ण अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थादेखील बिघडायला लागली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
मंचर येथे शेतकरी मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ बेनके, शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, विष्णूकाक हिंगे इत्यादी उपस्थित होते.
पवार म्हणाले, मोदींची ‘मन की बात’ आपण ऐकतो, मात्र आपली बात काही त्यांच्या नजरेत आली, असे दिसत नाही. देशातील ५२ टक्के लोकसंख्या शेतीच्या क्षेत्रात आहे. या व्यवसायात असलेल्या
माणसाची आर्थिक ताकद व्यवस्थित राहिली नाही तर देशाची अर्थव्यवस्था नीट रहात नाही. देश पुढे न्याययचा असेल, परिवर्तन करायचे असेल तर पहिले लक्ष्य ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे द्या, हे मोदीसाहेबांना सांगण्याची गरज आहे.
नोटाबंदीनंतर जिल्हा बँकेत ४,५०० कोटी रुपये जमा झाले. राज्याच्या बँकेत ७०० कोटी रुपये जमा झाले. एकंदर ५,२०० कोटी जमा झाले. मात्र केंद्राने हे ५,२०० कोटी रुपये घेण्यास नकार दिला.
हा पैसा अजूनही बँकेकडे पडून आले. हा पैसा स्वीकारा, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या असतानाही आज दहा दिवस झाले तरी हे सरकार स्वीकारत नाही. सामान्य लोकांच्या या बँकेवर सरकारचा विश्वास नाही, यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
यावेळी वळसे पाटील म्हणाले, कृषी मंत्री असताना देशाला व शेतकऱ्यांना वाचविण्याचे काम शरद पवार यांनी केले. मात्र सध्या शेतात पीक आहे पण भाव नाही. मागील वर्षीच्या दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका केंद्र व राज्य सरकारने घेतली नाही.
यावेळी देवदत्त निकम यांनी शेतकऱ्यांपुढील अडचणी व मागण्या मांडल्या. यावेळी शरदराव शिंदे यांनी सुत्रसंचालन केले. (वार्ताहर)

Web Title: The economy also got worse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.