रोहित पवारांच्या कारखान्यावर ईडीची कारवाई; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "एखादा युवक संविधानाच्या चौकटीत..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 09:15 PM2024-03-08T21:15:30+5:302024-03-08T21:16:46+5:30
या कारवाईनंतर सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुका तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. सक्तवसुली संचानालयाने (ईडी) रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ईडीच्या कारवाईबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी कारवाई होणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्या म्हणाल्या, सुडाचे राजकारण इतकी पातळी गाठेल असे वाटलं नव्हतं. एखादा युवक संविधानाच्या चौकटीत राहून भाषण करतो, त्यावर कारवाई होणे दुर्दैवी आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई केली आहे. ही कारवाई करण्याच टायमिंग बघा. लोकांचा कल त्यांच्या बाजूने नसला तर एजन्सीचा वापर करून भीती दाखवत आहेत. लोकशाहीचा हा विरोधाभास आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
दुसरीकडे, ईडीच्या कारवाईवरून रोहित पवार यांनीही सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला आहे. माझ्या कंपनीवर केलेल्या कारवाईची बातमी वाचली आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? असा उपरोधिक सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. ते म्हणाले की, माझ्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईची बातमी वाचली आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं की, झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू. माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत, अशा शब्दांत रोहित पवार यांनी टीका केली आहे.
काय आहे प्रकरण?
रोहित पवारांशी संबंधित कन्नड सहकारी साखर कारखान्यावर कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, ईडीकडून करण्यात आलेली ही कारवाई रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानली जात आहे. कन्नड सहकारी साखर कारखान्याला भंगारात निघाल्यानंतर त्याचा राज्य सहकारी बँकेने लिलाव केला. हा कारखाना ५० कोटी रुपयांमध्ये रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो लिमिटेड या कंपनीने खरेदी केला होता. या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याच प्रकरणात ईडीकडून बारामती अॅग्रोची चौकशी सुरू होती. या लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे एकमेकातले व्यवहार हे संशयास्पद असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.