Sanjay Raut: किरीट सोमय्यांचं नाव घेताच संजय राऊत संतापले; “अरे तो xxx आहे, महाराष्ट्रद्वेष्टा..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 03:37 PM2022-04-05T15:37:22+5:302022-04-05T15:50:25+5:30
अशा कारवायांनी शिवसेना, संजय राऊत झुकणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊतांनी दिली आहे.
मुंबई – मी खोटेपणाला घाबरणार नाही. आणखी जोमाने लढाई लढणार आहोत. तुम्ही तुमची कबर खणायला सुरूवात केली आहे. माझ्या धमण्यांमध्ये शिवसेना आहे. मस्तकाला बंदूक लावली तरी घाबरणार नाही. भविष्यात सगळ्यांचे नंबर येईल. ईडीची कारवाई ही आमच्यासाठी लढाईसारखी आहे. जर आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडू अशा शब्दात ईडीच्या कारवाईवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी(Sanjay Raut) भाष्य केले आहे.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना पत्रकारांनी किरीट सोमय्यांचं(Kirit Somaiya) नाव घेतले असता तर राऊत चांगलेच संतापले. राऊत म्हणाले, किरीट सोमय्या चु... आहे, महाराष्ट्रद्वेष्टा आहे. जो माणूस मराठीच्या विरोधात कोर्टात जातो. महाराष्ट्र द्रोही आहे. त्याच्याबद्दल काय प्रश्न विचारता तुम्ही असं बोलत राऊतांनी शेलक्या शब्दात भाजपावर टीकास्त्र सोडलं. कष्टाने कमवलेली संपत्ती ईडीने जप्त केली. १ रुपयाही अवैध मार्गाने जमा झाला असेल तर सगळी संपत्ती भाजपाला दान करू. ५५ लाखांचे कर्ज होते हे प्रतिज्ञापत्रात सांगितले होते. ईडीच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी आम्ही खंबीर आहोत. जप्त केलेल्या फ्लॅटमध्ये माझं कुटुंब राहतं. संपत्तीची व्याख्या बदलावी लागेल. तुमच्या बापाला घाबरत नाही असं राऊतांनी सांगितले.
तसेच माझं राहतं घर टू रुम किचन असेल. मराठी माणसांचं मध्यमवर्गीय कुटुंबाचं घर आहे. अलिबाग गाव आहे तिथे काही जमीन आहे मराठी माणसांकडे इतकी संपत्ती आहे. अशा कारवायांनी शिवसेना, संजय राऊत झुकणार नाही. मला कुठलीही नोटीस आली नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचाही फोन येऊ गेलेत. जे घडते ते सगळं चांगल्यासाठी घडते. ईडीच्या कारवाईचं आश्चर्य वाटत नाही. सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव होता असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.
काय म्हणाले होते किरीट सोमय्या?
आम्ही जे आरोप केले ते पुरावे देऊन केले. ज्यावेळी राऊतांनी ईडी कार्यालयात ५५ लाख परत केले तेव्हाच त्यांनी आपला गुन्हा कबुल केला होता. ईडीने यावरच थांबू नये. संजय राऊत यांच्या पत्नीचे प्रविण राऊतांच्या पत्नीसोबत आर्थिक गैरव्यवहार बाहेर आले आहेत. गेल्या २ महिन्यापासून राऊतांची धडपड, धावपळ, ईडीच्या अधिकाऱ्यांवर आरोप करणं त्यांची मानसिक अवस्था मी समजू शकतो. राऊतांनी १२ पानी पत्र लिहिलं. पोलिसांचा माफियासारखा उपयोग करून ईडी, सीबीआय, तपास यंत्रणांचे तोंड बंद करता येईल असं ठाकरे सरकारला वाटत होते. परंतु कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे अशा शब्दात भाजपा नेते किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.