सरनाईकांच्या घरांसह ११ कोटींच्या मालमत्तांवर ईडीने आणली टाच; शिवसेनेला आणखी एक झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 09:52 AM2022-03-26T09:52:10+5:302022-03-26T09:53:57+5:30

 नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल) घोटाळा प्रकरणात ईडीकडून जप्तीची कारवाई

ED attaches Shiv Sena MLA Pratap Sarnaik's assets in NSEL PMLA case | सरनाईकांच्या घरांसह ११ कोटींच्या मालमत्तांवर ईडीने आणली टाच; शिवसेनेला आणखी एक झटका

सरनाईकांच्या घरांसह ११ कोटींच्या मालमत्तांवर ईडीने आणली टाच; शिवसेनेला आणखी एक झटका

Next

मुंबई :  केंद्रीय तपास यंत्रणांकडून थेट मातोश्रीपर्यंत ठकठक झाली असताना, शिवसेनेला आणखी एक झटका देण्यात आला.  सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या राहत्या घरासह एकूण ११.३५ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.  नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल) घोटाळा प्रकरणात ईडीने ही जप्तीची कारवाई केली आहे. 

ईडीने नोव्हेंबर २०२० मध्ये सरनाईक कुटुंबीयांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीने सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंगचीही चौकशी केली होती. टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सरनाईक यांचा व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांची कसून चौकशी करीत त्यांना अटकही केली होती. तसेच सरनाईक आणि त्यांच्या मुलाचीही चौकशी केली होती. त्यावेळी त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. पुढे त्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने तपास थंडावला होता. मात्र, ईडीकडून पुन्हा कारवाईचा वेग वाढला आहे. 

तीन हजार कोटींची मालमत्ता जप्त
एनएसईएल घोटाळा प्रकरणात आतापर्यंत ३,२४२. ६७ कोटी रुपये किंमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच अधिक तपास सुरू असल्याचे ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले.  

 काय आहे प्रकरण? 
एनएसईएलमध्ये १३ हजार गुंतवणूकदारांच्या तब्बल ५ हजार ६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सप्टेंबर २०१३ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदविला होता. 
या गुन्ह्याच्या आधारे ईडीनेही एनएसईएलच्या संचालकांसह प्रमुख अधिकारी आणि २५ घोटाळेबाजांविरोधात चौकशी सुरू केली. 
आरोपींनी गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याचा गुन्हेगारी कट रचून त्यांना एनएसईएलमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले व बनावट गोदाम, पावत्या,  कागदपत्रे आणि बनावट खाती तयार करून फसवणूक केली.
आस्था ग्रुपकडे एनएसईएलची २४२.६६ कोटी रुपयांची थकबाकी होती. आस्था ग्रुपने २१.७४ कोटी रुपये विहंग आस्था हाऊसिंग प्रकल्पासाठी दिले. त्यापैकी ११.३५ कोटी रुपये विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडकडे वळते झाले. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित आहेत.

Web Title: ED attaches Shiv Sena MLA Pratap Sarnaik's assets in NSEL PMLA case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.