ईडीकडून अनिल देशमुख यांच्यावर कारवाईची शक्यता, अजामीनपात्र वाॅरंट काढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 12:26 PM2021-07-07T12:26:08+5:302021-07-07T12:28:26+5:30
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने प्राथमिक तपास करून अहवाल सादर केला होता.
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तीन वेळा समन्स बजावूनही चौकशीला गैरहजर राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांच्याविरूद्ध लवकरच अजामीनपात्र वाॅरंट काढले केले जाणार आहे. त्याबाबत कायदेशीर बाबींची पूर्तता केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने प्राथमिक तपास करून अहवाल सादर केला होता. त्याच्या आधारावर ईडीने देशमुख यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्यांच्या घरी छापे टाकून खासगी सचिव संजीव पालांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली आहे. देशमुख यांनी ईडीच्या कठोर कारवाईपासून संरक्षण मिळावे, यासाठी रविवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याबाबत अद्याप सुनावणी झालेली नाही. त्यामुळे त्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई करावी, असे ईडीच्या अधिकाऱ्यांचे मत बनले आहे. त्यानुसार त्याबाबत तांत्रिक व न्यायालयीन बाबींची पूर्तता केली जात आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. देशमुख यांनी सोमवारी ईडीला पत्र पाठवून आपल्याला जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप केला आहे.
ऋषिकेशचीही चौकशीकडे पाठ
देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. मात्र, त्यांनीही त्याकडे पाठ फिरवल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये स्वतःसह कुटुंबातील सदस्यांनाही ईडीच्या कठोर कारवाईपासून संरक्षण मागितले आहे. त्यामुळे ऋषिकेश देशमुख हे चौकशीसाठी गैरहजर राहिले असल्याचे सांगण्यात येते.