ईडी मिडी गूप चिडी...हिशोबात राहायचं; धनंजय मुंडेंकडून खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 05:28 PM2019-09-27T17:28:45+5:302019-09-27T17:30:00+5:30
राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने शिखर बँका घोटाळा प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. मात्र, सूडबुद्धीने निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याचा आरोप करत पवारांनीच ईडीला भेटायला जायचा डाव खेळला आणि ईडीला सपशेल माघार घ्यावी लागली. गेल्या तीन दिवसांपासूनचा च्या नाट्याचा खेळ अखेर पवारांनीच संपवला. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेलक्या शब्दांत खिल्ली उडविली आहे.
राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार आज मुंबईमधील ईडीच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करणार होते. मात्र पवारांनी घराबाहेर पडू नये अन्यथा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते अशी विनंती पोलिसांनी शरद पवारांनी केली. त्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधत पोलिसांच्या विनंतीला मान देत ईडी कार्यालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र पुण्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नुकसानाची पाहणा करण्यासाठी तात्काळ पुण्याला रवाना होत असल्याचे शरद पवारांनी ट्विट करत सांगितले.
यानंतर धनंजय मुंडे यांनी 'अळी मिळी गुप चिळी', या मराठी शब्दप्रयोगावरून ईडीची खिल्ली उडविली. ईडी मिडी गूप चिडी असा संदेश असलेले कार्टून त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे. तसेच यामध्ये त्यांनी चिमटीमध्ये पकडलेला उंदीर दाखवत शरद पवारांनी कसे ईडीला कात्रीत पकडले याचे वर्णन केले आहे.
हे कार्टून पोस्ट करताना त्यांनी ईडीसह सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. हिशोबात राहायचं, असा मॅसेज लिहून त्यांनी ईडी आणि सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडविली आहे. याचसोबत आय अॅम विथ पवारसाहेब असा हॅशटॅगही वापरला आहे.
हिशोबात राहायचं...#IAmWithPawarSaheb@PawarSpeaks@NCPspeakspic.twitter.com/swx3KPPKN4
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 27, 2019