'ईडी'ची नोटीस : ग्रामीण महाराष्ट्रातून वाढतोय पवारांना पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 05:47 PM2019-09-25T17:47:40+5:302019-09-25T18:07:06+5:30
महाराष्ट्रात दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याची परंपरा नसल्याचे पवारांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर पवारांना पाठिंबा देणाऱ्या पोस्टचा उत आला आहे.
- रवींद्र देशमुख
मुंबई - लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून केवळ नेत्यांच्या गळतीमुळे चर्चेत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणूक महिनाभरावर असताना चर्चेत आला आहे. ज्या सक्तवसुली संचलनालयाचा वापर विरोधकांना घाबरविण्यासाठी करण्यात येतो, त्याच ईडीमुळे राष्ट्रवादीला नवसंजीवणी मिळते की, काय असं वातावरण महाराष्ट्राच्या राजकारणात तयार होण्यास सुरू झालं की, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तब्बल 30 हून अधिक नेते सोडून गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे बॅकफूटवर गेला होता. तर अजित पवार यांच्यावर चौकशीची टाच आहे. अशा स्थितीत शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी घराबाहेर निघाले आहे. वयाच्या 78व्या वर्षी पवार पायाला भिंगरी लावून राष्ट्रवादीसह काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या सभांना राज्यात प्रतिसादही चांगला मिळत आहे.
दरम्यान सर्वकाही सुरळीत सुरू असताना शिखर बँकेत कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ईडीने पवारांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. उलट ईडीची नोटीस पवारांविषयी आणखी सहानुभूती निर्माण करणारी ठरत आहे. त्यातच पवारांनी ईडीच्या नोटीसनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण खुद्द पाहुणचार घेण्यासाठी ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना पुन्हा एकदा इशारा दिला. महाराष्ट्रात दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याची परंपरा नसल्याचे पवारांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर पवारांना पाठिंबा देणाऱ्या पोस्टचा उत आला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातूनही पवारांना पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे ईडीची नोटीस पवारांना आली असली तरी त्याचा लाभ राष्ट्रवादीलाच अधिक होणार असं चित्र सध्या तरी दिसत आहे.
अतिवृष्टी झाली की पवार, भूकंप झाला की, पवार महापूर आला की पवार, दुष्काळ पडला की पवार असं राज्यातील गेल्या अनेक वर्षांपासूनच चित्रच आहे. महाराष्ट्रात काहीही झालं तरी सर्वात आधी पवार तिथं पोहोचतात. त्याच्यावर सुडाचे राजकारण करणे म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातील अस्मितेला धक्का आहे. याचा परिणाम आगामी निवडणुकीत दिसेल.
शैलेश देशमुख, युवा कार्यकर्ते, चिखली.