पवारांवर 'ईडी'ने दाखल केलेल्या गुन्ह्यावरून भाजपमध्येच दुमत !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 06:24 PM2019-09-25T18:24:43+5:302019-09-25T18:30:34+5:30
फडणवीस आणि खडसे यांनी वेगवेगळी भूमिका घेतली असून पवारांना आलेल्या नोटीसीवरून भाजपमध्येच दुफळी असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई - राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातीय राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तर या चौकशीमागे सत्ताधारी पक्षाचे सुडबुद्धीचे राजकारण असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. मात्र ईडीच्या चौकशीनंतर भाजपमध्येच दुमत असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना आलेली नोटीस ईडीची कारवाई असल्याचे म्हटले आहे. तर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी वेगळीच भूमिका घेत पवारांची पाठराखण केली आहे. मी विरोधी पक्षनेता असल्यापासून विधानसभेत राज्य शिखर बँकेतील गैरव्यवहाराचा पाठपुरावा केला आहे. या गैरव्यवहारात कुठेही शरद पवार यांचे नाव सुरुवातीपासून नव्हते. हे मी जबाबदारीने सांगू शकतो. त्यामुळे आता अचानक यात शरद पवारांचे नाव कसे पुढे आले, याबाबत खडसेंनी शंका व्यक्त केली.
दुसरीकडे फडणवीस म्हणाले की ईडीने शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही. ईडी राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे पवार यांच्यावर राज्य सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे असं म्हणणं चुकीचं आहे. एकूणच फडणवीस आणि खडसे यांनी वेगवेगळी भूमिका घेतली असून पवारांना आलेल्या नोटीसीवरून भाजपमध्येच दुफळी असल्याचे दिसून येत आहे.