मोदी-शहांच पितळ उघडे पाडल्यामुळेच राज ठाकरेंना ईडीची नोटीस: धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 04:20 PM2019-08-19T16:20:34+5:302019-08-19T16:37:40+5:30
सत्ताधारी पक्ष हे त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी खोटी नोटीस पाठवत आहे.
मुंबई - शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात आज पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन झाली. त्यानंतर बालानगर येथे झालेल्या पहिल्या सभेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सभेला संबोधित करताना भाजपवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीत सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पर्दाफाश केल्यानेच त्यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली असल्याचा आरोप मुंडे यांनी केला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याने, राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. मनसे बरोबरच विरीधी पक्षाचे नेतेही आता राज यांच्या बाजूने उभे राहिले असल्याचे पाहायला मिळत आहे. याच मुद्यावरून धनंजय मुंडे यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेचा खरा चेहरा जनते समोर आणून त्यांचा पर्दाफाश केला, त्याचबरोबर मोदी आणि शहा दोघांचे पितळ उघडे पाडले. त्यामुळे या सरकारने राज यांना ईडीची नोटीस पाठवली असल्याचा आरोप मुंडे यांनी केला.
राज ठाकरेंना ईडीची नोटीस बजावली. कारण त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेचा पर्दाफाश केला होता. आवाज उघडला तर तो दाबण्यासाठी खोटी नोटीस पाठवली जात आहे. आघाडी सरकारने असं राजकारण केलं असतं तर आज भाजपचा 'भा' पण शिल्लक ठेवला नसता. pic.twitter.com/z0fVk7E0wB
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 19, 2019
सत्ताधारी पक्ष हे त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी खोटी नोटीस पाठवत आहे. आघाडी सरकारने असं राजकारण केलं असतं तर आज भाजपचे 'भा' पण शिल्लक उरला नसता आशा शब्दात धनंजय मुंडे यांनी युती सरकारवर हल्ला चढवला.