ईडीच्या अधिकाऱ्याने घेतली २० लाखांची लाच; सीबीआयकडून दिल्लीत अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 09:37 AM2024-08-09T09:37:15+5:302024-08-09T09:37:50+5:30
पैसे न दिल्यास अटक करू अशी धमकीही त्याला दिली. मात्र २५ लाख देणे शक्य नसल्याचे या ज्वेलरने संदीप सिंग यादव याला सांगितले.
मुंबई : मुंबईस्थित एका ज्वेलरला अटकेची धमकी देत त्याच्याकडून २० लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ईडीमधील सहायक संचालकाला सीबीआयने अटक केली आहे. संदीप सिंग यादव असे या ईडीच्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी ३ आणि ४ ऑगस्ट रोजी या मुंबईस्थित ज्वेलरच्या कार्यालयावर छापेमारी केली होती. या छापेमारीनंतर संदीप सिंग यादव याने संबंधित ज्वेलरशी संपर्क साधला आणि त्याच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास अटक करू अशी धमकीही त्याला दिली. मात्र २५ लाख देणे शक्य नसल्याचे या ज्वेलरने संदीप सिंग यादव याला सांगितले.
तडजोडीअंती २० लाख रुपये देण्याचे निश्चित झाले. ही रक्कम घेऊन त्याने संबंधित व्यापाऱ्याला दिल्लीतील लाजपत नगर मार्केट परिसरात बोलावले होते. दरम्यानच्या काळात, संबंधित ज्वेलरने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत लेखी तक्रार केली. त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून संदीप सिंग यादव याला २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. यादव हा मूळ केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा अधिकारी असून गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून तो ईडीमध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहे.