संजय राऊत प्रकरणात ईडीची पुन्हा छापेमारी; गुरू आशिष कन्स्ट्रक्शनची कागदपत्रे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 07:11 AM2022-08-03T07:11:33+5:302022-08-03T07:11:53+5:30
एकूण ४७ एकर जागेवर असलेल्या पत्राचाळ पुनर्विकासाचे काम गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले होते. या कंपनीमध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत हे संचालक होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या चौकशीच्या अनुषंगाने ईडीच्या अधिकाऱ्यांनी गोरेगाव येथील गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयावर मंगळवारी छापेमारी करीत काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते.
एकूण ४७ एकर जागेवर असलेल्या पत्राचाळ पुनर्विकासाचे काम गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले होते. या कंपनीमध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत हे संचालक होते, तर याच कंपनीमध्ये राकेश कुमार वाधवान आणि सारंग वाधवान यांचीदेखील हिस्सेदारी होती. पुनर्विकासाच्या कामातून तेथील ६७२ रहिवाशांना घरे देणे आणि तीन हजार फ्लॅटस् म्हाडाला हस्तांतरित करणे अपेक्षित होते. मात्र, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने येथे पुनर्विकासाचे काम न करता ती जागा आणि त्यावरील चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) यांची आठ बिल्डरांना विक्री केली. या विक्रीतून या कंपनीला १,०३९ कोटी ७९ लाख रुपये मिळाले.
राऊत यांचा ‘फ्रंट मॅन’
याप्रकरणी सन २०१८ मध्ये म्हाडाने तक्रार केली होती. त्यानंतर प्रवीण राऊत, वाधवान बंधू यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केली. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे ‘फ्रंट मॅन’ म्हणून काम करीत असल्याचा आरोप ईडीने केला. संजय राऊत यांची ईडी कोठडी ४ ऑगस्टपर्यंत आहे. मात्र, त्यांच्या चौकशीतून जी माहिती पुढे येत आहे, त्या अनुषंगाने अधिकारी कागदपत्रांची पडताळणी करीत आहेत.