Anil Deshmukh: अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, काटोल आणि वडविहिरातील निवासस्थानी ईडीचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 11:20 AM2021-07-18T11:20:00+5:302021-07-18T11:22:10+5:30
ED raid on Anil Deshmukh's house: नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे.
नागपूर: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालय(ED)नं छापेमारी केली आहे. आज(दि.18) सकाळपासूनच ईडीची छापेमारी सुरू आहे. दरम्यान, ईडीने यापूर्वीच देशमुखांची 4.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. आता आजच्या छापेमारीमध्ये ईडीच्या हाती काय लागतं, हे पाहणं महत्वाचं असेल.
मनीलॉंडरींग प्रकरणी नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथील अनिल देशमुख यांच्या वडिलोपार्जित घरात ईडीच्या अधिकाऱ्यांची सर्च मोहीम सुरू आहे. आज सकाळी ईडीचे चार अधिकारी नागपूरात दाखल झाले होते. त्यानंतर ते देशमुख यांच्या निवसस्थानी काटोल येथे गेले. काही दिवसांपूर्वी देशमुख यांची 4.20 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली होती. या जप्त केलेल्या मालमत्तेत मुंबईतील वरळी येथील 1 कोटी 54 लाखांचा निवासी फ्लॅट, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुतूम गावातील 25 प्लॉट्सचा समावेश आहे. आता पुन्हा ईडीने आपली चौकशी सुरूच ठेवली आहे. विशेष म्हणजे रविवार असूनही ईडीच्या धडक कारवाया चालू आहेत.
म्हणून अनिल देशमुख यांच्यावर कारवाई...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर सचिन वाझेला 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. देशमुखांनी सचिन वाझेच्या मदतीने मुंबईतील बारचालकांकडून अवैधरित्या 4 कोटी 70 लाख रुपये वसूल केले. तसेच दिल्लीतील एका बनावट कंपनीच्या माध्यमातून अनिल देशमुख यांनी 4 कोटी 18 लाख रुपये जमवले असून, ते श्री साई शिक्षण संस्था या ट्रस्टमध्ये आल्याचे भासविल्याची माहितीही ईडीकडे असल्याचे समजते.
त्यानुसार गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे. ईडीने यापूर्वी देशमुख यांची मुंबई आणि नागपुरातील घरे तसेच कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. त्याचबरोबर देशमुख यांचे दोन सचिव कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक केली असून, दोघेही ईडीच्या कोठडीत आहेत. तर तळोजा कारागृहात असलेल्या सचिन वाझेचाही या प्रकरणात ईडीने जबाब नोंदवला आहे.
आरती देशमुख यांच्याकडून ईडीकडे कागदपत्रे सुपुर्द
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला गैरहजर राहणाऱ्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी ईडीला आवश्यक असलेली कागदपत्रे सुपुर्द केली आहेत. ईडीकडून 4.20 कोटींची मालमत्ता जप्तीची कारवाई शुक्रवारी करण्यात आली, त्याच दिवशी त्यांनी वकिलामार्फत कागदपत्रे दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.