मुश्रीफांच्या घरावर ईडीचा छापा; किरीट सोमय्यांचे आरोप, नेमके काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 11:48 AM2023-01-11T11:48:51+5:302023-01-11T11:50:16+5:30
Hasan Mushrif ED Raid : कागलमध्ये 26 अधिकाऱ्यांचे पथक असून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. लोकांची घराबाहेर गर्दी असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
कोल्हापूर : माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवसस्थानी बुधवारी पहाटे ईडीने छापा टाकला. कागलसह हसन मुश्रीफ यांचे पुण्यातील निवासस्थान तसेच सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी केली आहे. ईडी आणि आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
कागलमध्ये 26 अधिकाऱ्यांचे पथक असून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. लोकांची घराबाहेर गर्दी असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे. यापूर्वी जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. आयकर विभागाने केवळ कोल्हापुरातच नव्हे तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. मात्र, त्यांना काहीच सापडले नसल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला होता.
हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा; लोकांची घराबाहेर गर्दी, पोलीस बंदोबस्त तैनातhttps://t.co/CbvSFUBywh">https://t.co/CbvSFUBywh; https://t.co/Wj8oCPPLy9">pic.twitter.com/Wj8oCPPLy9
— Lokmat (@lokmat) https://twitter.com/lokmat/status/1613036317318975490?ref_src=twsrc%5Et…">January 11, 2023
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी 1 जानेवारी रोजी ट्विट करताना माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना सूचक इशारा दिला होता. या ट्विटनंतर पहिल्यांदा अनिल परब (Anil Parab) आणि आता हसन मुश्रीफ यांना ईडीकडून झटका बसला आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केले होते. हसन मुश्रीफ हे महाविकास आघाडी सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री असताना केंद्र सरकारकडून ग्रामविकास विभागाला 1500 कोटी रुपयांचा निधी आला होता. त्याचे कंत्राट नातेवाईकांना दिले गेले अशी तक्रारही किरीट सोमय्यांनी केली होती.
बोगस बँक अकाउंटमध्ये व्यवहार झाल्याचा आरोप
हसन मुश्रीफांच्या मुलाने बोगस बँक अकाउंट उघडले. या अकाउंटमध्ये ज्या कंपन्या बंद झाल्या तिथून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाले. हा आयपीसीच्या अंतर्गत गुन्हा असल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले होते. तसेच, 2020 मध्ये पारदर्शक व्यवहार न होता अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला. या कंपनीस साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना या कंपनीला कंत्राट का दिले? हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. मी पुरावे दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुश्रीफांना हे कंत्राट रद्द करण्यास सांगितले.