NCP नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड; दीड महिन्यात तिसऱ्यांदा कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 09:49 AM2023-03-11T09:49:56+5:302023-03-11T10:01:09+5:30

विशेष म्हणजे शुक्रवारीच उच्च न्यायालयाकडून हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळाला होता.

ED raids NCP leader Hasan Mushrif's house again; Second action in a month and a half | NCP नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड; दीड महिन्यात तिसऱ्यांदा कारवाई

NCP नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड; दीड महिन्यात तिसऱ्यांदा कारवाई

googlenewsNext

जहांगीर शेख

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड पडली आहे. कागल येथील मुश्रीफांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू केली आहे. दीड महिन्यांत तिसऱ्यांदा मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कागलमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

विशेष म्हणजे शुक्रवारीच उच्च न्यायालयाकडून हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी झालेल्या या कारवाईने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. मुश्रीफांवर २४ एप्रिलपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत; तर न्यायालयाने भाजपा नेते किरीट सोमय्या यांनाही झटका देत फसवणूकप्रकरणी कोल्हापूर न्यायदंडाधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्यावर कारवाई सुरू करण्याच्या दिलेल्या आदेशाची प्रत सोमय्या यांच्या हाती कशी आली? याची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने शुक्रवारी दिले. सोमय्या संबंधित प्रकरणात पक्षकार नसतानाही त्यांना आदेशाची प्रत मिळाली होती.

मुश्रीफ यांच्या निवासस्थानी सकाळी आठच्या सुमारास इडीचे पथक मोठ्या फौजफाटा घेऊन दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान कारवाईची बातमी समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गैबी चौक आणि मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर जमले असुन तणावाची परीस्थिती तयार झाली आहे. सध्या आमदार मुश्रीफ हे निवासस्थानी नाहीत. जवळपास डझनभर वाहनातून दहा ते बारा अधिकारी आणि ३०-३५ CRPF जवान आले आहेत. ही राजकीय कारवाई असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते भय्या माने यांनी केला आहे.

हसन मुश्रीफ अडचणीत 
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केडीसीसीविरोधात लेखी तक्रार केली होती. त्यानंतर विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी जिल्हा उपनिबंधकांना प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. त्यांचा अहवाल १ मार्च २०२३ रोजी विभागीय सहनिबंधकांना प्राप्त झाला. त्यानंतर हे चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी डी. टी. छत्रीकर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था [लेखापरीक्षण] यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार छत्रीकर यांनी बुधवारी संध्याकाळीच बॅंकेला भेट दिली. मात्र, ज्या मुद्द्यांबाबत लेखापरीक्षण करावयाचे आहे त्यातील बहुतांशी दस्तऐवज हा ‘ईडी’ने कुलूपबंद केला असल्याने प्राथमिक माहिती घेऊन ते परतले.

सोमय्या यांनी ८ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा बॅंकेविरोधात ‘ईडी’ने केलेल्या कारवाईबाबत तक्रार केली होती. त्यानंतर याबाबत चौकशी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांची नियुक्ती करण्यात आली; परंतु तक्रारींचे मुद्दे आणि कागदपत्रांच्या प्रती पाहिल्या असता तक्रार झालेल्या मुद्द्यांबाबत त्यातून स्पष्टता होत नाही, असा अहवाल जिल्हा उपनिबंधकांनी दिला होता. त्यानंतर आता चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत.
 

Web Title: ED raids NCP leader Hasan Mushrif's house again; Second action in a month and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.