पाच चित्रपट निर्माता कंपन्यांवर ईडीचे छापे, महादेव ॲपने पैसे गुंतविल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 07:55 AM2023-10-08T07:55:50+5:302023-10-08T07:56:41+5:30
या छापेमारीदरम्यान कुरेशी प्राेडक्शन हाउस या कंपनीच्या मालकाची ईडीने चौकशी केल्याचे समजते.
मुंबई : महादेव ॲप प्रकरणाची व्याप्ती आता वाढत असून, याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवार व शनिवार, अशा दोन दिवशी मुंबईतील पाच चित्रपट व मालिका निर्मात्या कंपन्यांच्या कार्यालयावर छापेमारी केली आहे. महादेव ॲप कंपनीने या पाच कंपन्यांमध्ये पैसे गुंतवल्याचा ईडीला संशय आहे.
या छापेमारीदरम्यान कुरेशी प्राेडक्शन हाउस या कंपनीच्या मालकाची ईडीने चौकशी केल्याचे समजते. विशेषतः कंपनीमध्ये असलेली गुंतवणूक, त्याचा स्रोत, कंपनीने केलेले आर्थिक व्यवहार, तसेच कंपनीच्या मालकाच्या परदेशी प्रवासाचा तपशील, आदी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी गोळा केल्याचे समजते. याच कंपनीने गेल्यावर्षी बॉलिवूडमधील एका मोठ्या नटासोबत एका मोठ्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली होती.
महादेव ॲपप्रकरणी गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांना ईडीने समन्स पाठविण्यास सुरुवात केली आहे.